सातारा शहरातील शुक्रवार पेठ परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकामस्थळी संरक्षणासाठी लावण्यात आलेली नेट-जाळी व पत्रे रस्त्यावर आल्याने पादचारी आणि वाहनचालकांच्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. बांधकाम सुरू असताना आवश्यक सुरक्षाव्यवस्था न पाळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.या इमारतीचे काम जावली तालुक्यातील एका माजी आमदारांशी संबंधित कंत्राटदाराकडे असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. त्यामुळे प्रशासन आणि पालिका यंत्रणा कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे संबंधित लोकप्रतिनिधींच्याच प्रभागात हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या बिल्डरच्या पाठीशी नेमके कोणते लोकप्रतिनिधी आहेत? सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करूनही कारवाई का होत नाही? असे प्रश्न आता सर्वसामान्य सातारकर विचारू लागले आहेत.
नागरिकांची मागणी आहे की, सातारा पालिकेने तात्काळ पाहणी करून बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत आणि नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.






