सातारा शहरातील ऐतिहासिक राजवाडा परिसर तसेच चांदणी चौक परिसर दिवसेंदिवस अतिक्रमणांच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यांवर वाढलेले हातगाडे, फेरीवाले आणि अनधिकृत स्टॉलमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सातारा पालिकेने तातडीने कारवाई करून हा परिसर अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी सातारकरांतून जोर धरू लागली आहे.
राजवाडा ते चांदणी चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. या मार्गावर दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांची ये-जा असते. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या हातगाड्यांमुळे वाहनांसाठी जागाच उरत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,पालिकेकडून अधूनमधून अतिक्रमण हटाव मोहिमा राबवल्या जातात. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी हातगाडे आणि स्टॉल उभे राहत असल्याने पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळेच रस्त्यावर पुन्हा हातगाडे लावले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय वाढल्याने पादचारी मार्गही अडवले जात असून महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सातारकरांनी आता सातारा पालिका प्रशासनाने ठोस भूमिका घेत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. फक्त दिखाऊ कारवाई न करता शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करून वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, “राजवाडा – चांदणी चौक अतिक्रमणमुक्त होणार का?” हा प्रश्न आता सर्वसामान्य सातारकर विचारू लागले असून पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे शहराचे लक्ष लागले आहे






