सीईओंच्या दालनासमोर आंदोलन : सुशांत मोरे

110
Adv

सातारा जिल्हा परिषदेमध्ये सर्वच विभागात झालेल्या बदल्या चुकीच्या पध्दतीने झाल्या आहेत. या बदल्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दि. 2 जून रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.याप्रश्नी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भोंगळ कारभार सुरु आहे.

त्याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये आला. अर्थ, कृषी, पशुसंवर्धन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत या विभागातील प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या वेळापत्रकानुसार करण्यात आल्या. वेळापत्रकानुसार बदल्या करताना प्रशासनाने प्रत्येक कर्मचार्‍याला रिक्त जागा स्क्रिनवर दाखवून बदल्या करण्यात आल्या. काही ठिकाणी रिक्त जागा असतानाही त्या ठिकाणी कर्मचार्‍यांनी मागणी करूनही त्या जागा जाणीवपूर्वक रिक्तच ठेवल्या. अधिकार्‍यांकडून त्यासाठी मनमानी करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.
सर्व विभागाच्या झालेल्या बदल्या ह्या जाणीवपूर्वक, हेतुपूरस्सर व प्रशासकीय दबावाने केल्या असून यामध्ये सर्वच विभागातील अधिकार्‍यांचा सहभाग आहे. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांवर अन्याय झाला आहे. काही कर्मचार्‍यांच्या बदल्या नियमानुसार झाल्या मात्र अनेक कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांनी दांडलले. याकामी सर्व विभागातील अधिकारी व खातेप्रमुखांचे दि. 1 मे ते आजअखेरचे कॉल रेकॉर्ड, व्हॉटसअ‍ॅप कॉल, सीडीआर तपासावेत. दोषीअंती संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी. तसेच आतापर्यंत झालेल्या बदल्या ह्या निपक्षपातीपणे करण्याकामी नव्याने आदेश व्हावेत. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास दि. 2 जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे.
संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास होणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी ही प्रशासनाची राहिल, असेही सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Adv