शिवकालीन गडकोट किल्ले इत्यादी वास्तुं आपल्याला जगण्याची उर्मी देतात. आपल्या पूर्वजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची
यशोगाथा सांगतात.युगपुरुष शिवशंभु राजांच्या पराक्रमी इतिहासाचे मुक साक्षीदार असलेल्या या वास्तु आज ढासळत असल्याचे पहायला मिळते. गडकोट किल्ले या वास्तुंनी आपला महान इतिहास बोलका केला आहे. म्हणूनच शिवनेरी, प्रतापगड, अजिंक्यतारा येथे रोप-वे सह, परिसर विकास साधणे या प्रमुख मागणीबरोबरच, राज्यातील शिवकालीन सर्व वास्तुंच्या संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकारण निर्माण करावे
अशी मागणी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे आम्ही केली होती. ना. एकनाथ शिंदे यांनी गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापना करण्याची केलेली घोषणा, आमच्यासह अनेकांच्या प्रयत्नांना यश देणारी आणि स्वागतार्ह आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
याबाबत, दिनांक 10 सप्टेंबर 22 रोजी, राज्याचे मुख्य मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आम्ही लेखी निवेदन दिले आहे असे नमुद करुन,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, मराठयांचा अजरामर इतिहासाची साक्ष असणारे गडकोट किल्ले यांच्या संरक्षणाची शिवप्रेमींप्रमाणेच राज्यसरकारचे पहिले कर्तव्य आहे असे आमचे मत आहे. शिवनेरी किल्ला युगपुरुष छत्रपती शिवाजीमहाराजांचे जन्मस्थान आहे.येथील इतिहास पुढील पिढयांना आत्मसात करता यावा याकरीता किल्ले शिवनेरीवर रोप-वे सह, अनेक सुविधा देणे गरजेचे आहे. किल्ले शिवनेरीबरोबरच आजुबाजुच्या परिसराचा विकास झाल्यास, याठिकाणी येणा-या शिवप्रेमी आणि इतिहास प्रेमींना अधिक सुलभ होणार आहे. आज देखिल लाखो व्यक्ती शिवनेरीवर जावून,शिवजन्मस्थानाची माती कपाळी लावून कृतकृत्य होत असतात. बहुतेक सर्व वयोगटातील व्यक्तींना शिवनेरीवर जाता यावे म्हणून येथे रोप-वे आवश्यक आहे.
शिवनेरी प्रमाणेच किल्ले प्रतापगडचा जाज्वल्य पराक्रमी इतिहास सर्वांना जवळून अनुभवण्यासाठी येथे रोप-वे ची गरज आहे. रोपवे उभारणी मुळे भेट देणा-या व्यक्तींचा वेळ आणि श्रम वाचण्याबरोबरच जेष्ठ नागरीकांनाही जेथे परमप्रतापी शिवप्रभुंनी इतिहास घडवला त्या ठिकाणांची अनुभुती घेता येणार आहे.
किल्ले अजिंक्यतारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. रायगड येथे असलेली राजधानी, छत्रपती राजाराज महाराज यांनी किल्ले अजिंक्यतारा येथे वसवली. राजगड, रायगड आणि त्यानंतर किल्ले अजिंक्यतारा या मराठा साम्राज्याच्या तत्कालीन राजधान्या होत्या.किल्ले अजिंक्यतारा राजधानी असतानाच मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकविणेत आला होता. परंतु गेल्या काही दशकात किल्लेअजिंक्यताराचा विकास किंवा येथील पडझड झालेल्या वास्तुंचे जतन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या किल्यांचा इतिहास पुन्हा जागृत करण्यासाठी विकास, संवर्धन होणे गरजेचे आहे.याबाबत आम्ही नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शिवनेरी,प्रतापगड,अजिंक्यतारा या किल्यांसह,शिव प्रभुंच्या सर्वच गडकोट किल्यांच्या संरक्षण आणि संवर्धन विकासा बाबत स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणेकामी विस्तृत चर्चा केली आहे. दरम्यान,ना.एकनाथ शिंदे यांनी गटकोट किल्यांच्या विकासाकरीता स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषण केली आहे.आमच्या तसेच अनेक शिवप्रेमींच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देणारी ही बाब स्वागतार्ह आहे. राज्यमंत्रीमंडळ लवकरच महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेईलच तथापि त्याकरीता भरीव निधी देखिल उपलब्ध करुन देईल अशी आमची खात्री आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.






