मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीवरून स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) येत्या 11 ऑक्टोबरला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आता मराठा समाजाची परिक्षा पाहू नये, असा इशारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी दिला आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणाले कि, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही सरकारने ११ ऑक्टोबरलाच परिक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. एकीकडे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससी परिक्षा घेण्याची एवढी घाई का आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. मराठा समाज हा जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये, असेही त्यांनी म्हंटले आहे.