Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Uncategorized सातारा पालिकेकडून गुरव कुटुंबावर अन्याय : पाच दिवसापासून कुटुंब दहशतीखाली

सातारा पालिकेकडून गुरव कुटुंबावर अन्याय : पाच दिवसापासून कुटुंब दहशतीखाली

434
Adv

20एसएटीए 41 सातारा : अतिक्रमण विरोधी पथक आल्याने घराच्या दारासमोर रडत बसलेल्या शशिकला गुरव, संजय गुरव व कुटुंबिय
20एसएटीए 42 सातारा : अतिक्रमण काढण्यास आल्याने गुरव कुटुंबियांनी प्रचंड आकांत केला यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता यावेळी नागरिकांनी केलेली गर्दी

शुक्रवार पेठेतील कोटेश्वर मंदिरासमोर गेल्या 35 ते 40 वर्षांपासून सातारा पालिकेचे भाडेकरु म्हणून रहात असलेल्या एका जुन्या घराचे अतिक्रमण काढण्यासाठी शुक्रवारी दुपारी पालिकेचा अतिक्रमण विभाग आला. यावेळी भाडेकरु गुरव कुटुंबियांनी प्रचंड आकांत केल्याने आणि त्यातील एकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पालिकेकडून आमच्यावर अन्याय असून गेल्या पाच दिवसांपासून आम्ही दहशतीखाली जागत असल्याचे गुरव कुटुंबियांनी सांगितले. यामध्ये राजकीय दबावातून ही कारवाई सुरु असल्याची चर्चा जमलेल्या नागरिकांमध्ये सुरु होती.
शुक्रवार पेठेतील मिळकत क्रमांक 73 मध्ये गेल्या 35 ते 40 वर्षांपासून शशिकला गुरव व त्यांची दोन मुले संजय, अशोक गुरव व त्यांच्या पत्नी मुलासह रहात आहेत. पालिकेचे रीतसर भाडे भरत असून त्यांना सर्व सुविधाही पालिकेकडून पुरवण्यात आल्या आहेत. मात्र, तेथील मिळकत क्रमांक 74 मध्ये नवीन बांधकाम करण्याच्या हालचाली सुरु असून त्यामध्ये येत असलेली गुरव कुटुंबियांची जागा अडचणीची ठरत असल्याने ती अतिक्रमण असल्याचे दाखवून राजकीय दबावातून शशिकला गुरव यांना घर खाली करण्याची नोटीस काढण्यात आली. गेल्या काही महिन्यापासून हा प्रकार सुरु असून याबाबत गेल्या पाच दिवसांसपासून गुरव कुटुंबावर घर खाली करण्यासाठी प्रचंड दबाव वाढला आहे. त्यातूनच शुक्रवारी दुपारी पालिकेची अतिक्रमण विभागाची गाडी घेवून अधिकारी तिथे आले. त्यावेळी गुरव कुटुंबियांनी एकच आंकात सुरु केला.
यावेळी संजय गुरव यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने अतिक्रमण पथकाची चांगलीच भंबेरी उडाली होती. तर शशिकला गुरव या अतितणावातून बेशुध्द पडल्याने परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. एकीकडे घर जात असल्याने गुरव कुटुंबियांचा सुरु असलेला आकांत, रडारडी यामुळे परिसरातील त्यातच अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. काही युवक, नागरिक गुरव कुटुंबियांना सावरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आलेल्या अतिक्रमण विरोधी पथकामुळे हे सर्व कुटुंबिय हतबल होवून प्रचंड आकांत करत होते. त्यातूनच शेवटी शशिकला गुरव यांची शुध्द हरपल्याने त्यांची मुले, सुना सर्वजण घाबरुन गेले होते.
पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी वरिष्ठांना दूरध्वनीवरुन माहिती देत होते. त्यांच्यावरही प्रचंड दबाव असल्याचे जाणवत होते. याबाबत त्यांना विचारले असता हा वेगळा प्रकार आहे नंतर सांगतो असे ते म्हणाले. मात्र नंतर त्यांनी आमचे वरिष्ठ भाऊसाहेब पाटील यांना फोन करा सांगितले. माहिती घेण्यासाठी पाटलांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही. भर उन्हात सुरु असलेल्या प्रकारात शेवटी शशिकला गुरव यांची शुध्द हरपली तर त्यामुळे अतितणावातून त्यांचा मुलगा संजय याने आदळआपट सुरु करत स्वतःलाच मारुन घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेवटी नागरिकांनी अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी तेथून काढण्यास सांगितले. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी गुरव कुटुंबियांची समजूत काढून त्यांना पोलीस ठाण्यात नेले.
आम्ही न्यायालयात गेलो आहोत
गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही रहात असलेले घर पालिका काढून घेत आहे. याबाबत आम्ही न्यायालयात गेलो आहोत. त्याची प्रक्रिया सुरु असताना गेल्या पाच दिवसांपासून पालिकेतून आमचे घर पाडून टाकण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथक येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून आम्ही काही खाल्ले देखील नाही. आमची एक मुलगी नुकतीच बाळंत झाली असून त्यातच हा प्रकार सुरु असल्याने आम्हाला खूप त्रास होत आहे. आम्हा पर्यायी जागा न देता पालिका जबरदस्तीने काढून टाकत असल्याचा आरोप अशोक गुरव यांनी केला.
चौकट
राजकीय दबावातून कारवाईचा आरोप
दरम्यान हा सर्व प्रकार सुरु झाल्याने तिथे नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाला देखील हतबल होण्याची वेळ आली. यावेळी जमलेल्या नागरिकांमध्ये ही एका गरीब कुटुंबावर त्यांना पर्यायी जागा न देता राजकीय दबावातून कारवाई सुरु असल्याची चर्चा सुरु होती. गुरव यांच्या घराच्या पाठीमागील कुटुंबाने हा दबाव आणला असून त्यातूनच गुरव कुटुंबाला बेघर केले जात असल्याच्या भावना व्यक्त होत्या.

Adv