मी राजकारण नाही समाजकारण करतो असे नेहमी म्हणणाऱ्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपले म्हणणे खरोखर कृतीत उतरविले . शनिवारी बावधन ता वाई येथे प्रशासनाचे नियम झुगारून बगाड भरविणाऱ्या 83 जणांना पोलिसांनी अटक केली होती . या सर्वांच्या जामीनाची तब्बल 4 लाख 15 हजार रुपये रक्कम खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी स्वतः वाई न्यायालयात भरली .
बावधन येथील बगाडाच्या धार्मिक कार्यक्रमात करोना नियमाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेऊन वाई पोलिसांनी 105 जणांना ताब्यात घेऊन 85 जणांना अटक केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती . या प्रकरणी जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले होते . अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील स्वतः वाईमध्ये तळ ठोकून राहिल्याने बगाडाच्या पारंपारिक विधीत भाग घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार हे स्पष्ट झाले होते . बगाड प्रकरणातील 83 जणांना पोलिसांनी अटक केल्याचे समजताच स्वतः खासदार उदयनराजे भोसले हे तडक साताऱ्यातून वाईला पोहोचले . अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांची भेट घेऊन उदयनराजे यांनी एकंदर परिस्थितीची माहिती घेतली .
लवकरात लवकर अटक झालेल्यांची सुटका व्हावी यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे आग्रही होते त्यासाठी वाई न्यायालयात त्यांनी वकिलांच्या हस्ते प्रत्येक कार्यकर्त्याचा पाच हजार रुपये जामीन याप्रमाणे तब्बल 4 लाख 15 हजाराची रक्कम भरली . ही जामीन प्रक्रिया शनिवारी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू होती . खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे वेळप्रसंगी कोणाच्याही हाकेला धावून जातात, राजकारणापेक्षा त्यांच्या समाजकारणाचा अंदाज अफलातून आहे अशी प्रतिक्रिया या निमित्ताने ऐकायला मिळाली . बावधन ग्रामस्थांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मनापासून आभार मानले आहेत .