जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर कोणतेही सामाजिक कार्य नसलेल्या जय भवानी सांस्कृतिक प्रतिष्ठानने अतिक्रमण करुन डल्ला मारला आहे. ते अतिक्रमण हटवून त्याजागी कोवीड रुग्णालय उभे करावे.सदरचे अतिक्रमण काढले नाही तर लोकशाही मार्गाने १५ आँगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी निवेदन देऊन सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी इशारा दिला आहे.
साताऱ्यातील पेठ सदरबझार सि.स.नं. ४६७ / १० ही मिळकत मेडीकल डिपार्टमेंट,महाराष्ट्र शासनाची असून तेथे एका माजी नगरसेवकाच्या जयभवानी सांस्कृतिक प्रतिष्ठान अनाधिकृतपणे अतिक्रमण करुन तिथे बांधकाम करत जागेवर डल्ला मारला आहे. याबाबत माहितीचा अधिकार वापरून सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी हे अतिक्रमण उघड केले. यापूर्वी शहरातील काही कार्यकर्त्यांनी या अतिक्रमण केलेले शेड, बांधकाम काढून टाकण्यासाठी आंदोलने केली होती. प्रत्येक वेळी प्रशासनाचे अधिकारी राजकीय दबावाखाली कारवाई करत नाहीत. याचा सुशांत मोरे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी सुद्धा हे अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित प्रतिष्ठानला वारंवार कायदेशीर मार्गाने कळविले असताना ही त्याची दखल घेतली नाही.जिल्हा रुग्णालयाच्या जागेतील अतिक्रमण तत्काळ काढून त्या ठिकाणी कोविड रुग्णालयाची उभारणी करावी.
जिल्हा रुग्णालयाच्या जागेवरील अतिक्रमण तत्काळ काढले नाही तर येत्या १५ आँगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा लेखी इशारा जिल्हा शल्यचिकित्सकांना सुशांत मोरे यांनी दिला आहे.