सातारा जिल्हयात मुख्यालयाचे ठिकाणी प्रायोगिक तत्वावर शिवभोजन एस.टी.कॅटींग सातारा येथे दररोज १५० थाळी, जिल्हा परिषद ऑफिस कॅटींग सातारा येथे दररोज १५० थाळी, बेंद्रे स्नॅक्स मोती चौक राजवाडा येथे दररोज १०० थाळी व क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे दररोज १०० थाळी याप्रमाणे दररोज ५०० थाळी भोजन प्रायोगिक तत्वावर तिमाही कालावधीसाठी देणेत येणार आहे.
एस.टी.स्टॅड सातारा येथील एस.टी. कॅटींग येथील शिवभोजनाचे उदघाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे हस्ते दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.
भोजनालये दुपारी १२ ते २ या कालावधीत कार्यरत रहाणार आहेत. या भोजनालयामध्ये बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेवून जाण्यास मनाई आहे. शासकीय कर्मचा-यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे तेथील आस्थापनेवरील कर्मचा-यांना सवलतीच्या दरात भोजन घेण्यास सक्त मनाई असेल. कोणत्याही परिस्थितीत शिळे अथवा खराब झालेले अन्न ग्राहकांना पुरविण्यात येणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी भोजनालय चालक यांची राहणार आहे. भोजनालय चालकास शासनामार्फत देणेत येणा-या महाअन्नपूर्णा या मोबाईल अॅपवर प्रत्येक लाभार्थ्यांचा फोटो, माहिती व असल्यास लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर ही माहिती भरणे भोजनालय चालकावर बंधनकारक राहील. एकाच लाथार्थ्यांकडून एकावेळी एकापेक्षा जास्त वेळा थाळी घेतली जावू नये याची दक्षता कटाक्षाने घेणे भोजनालय चालकावर बंधनकारक राहणार आहे,
अन्न पुरविणे भोजनालय चालकावर बंधनकारक असणार आहे. त्यामध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, 1 मूद भात व १ वाटी वरण समाविष्ट असलेली थाळी रु. १०/- प्रमाणे प्रती थाळी याप्रमाणे भोजन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधीत भोजनालय चालक यांची राहील. पोषक पदार्थ, स्वच्छ परिसर व गुणवत्तापूर्ण भोजन ही त्रिसुत्री त्यासाठी अवलंबिली जाणार आहे. जास्तीत जास्त गरीब व गरजू व्यक्तींनी सवलतीच्या दरातील भोजनाचा लाभ घेवून ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.