काही दिवसापूर्वीच दैनिक सातारानामाने वृत्त प्रसारित केले होते की पालिकेच्या उपाध्यक्षपदाची निवड ही येत्या गुरुवारी होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले असून सातारा पालिकेत उपनगराध्यक्ष निवडीची हालचाल सुरू झाली आहे या निवडीसाठी गुरूवार दि ५ रोजी विशेष सभा बोलाविली जाणार असून सकाळी अकरा वाजल्यापासून निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे .
या निवड प्रक्रियेत पीठासन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या नगराध्यक्ष माधवी कदम मात्र या निवड प्रक्रियेच्या हवाल्यासाठी उपलब्ध झाल्या नाहीत . मात्र सोमवारी पालिका प्रशासन सभा सचिवांकडून सभा बोलावणे, उमेदवारांना नामनिर्देशन कालावधी ठरवून देणे व अर्जाची छाननी करणे या विहित नमुन्यांची कागदपत्रे तयार करून ती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना सादर करण्याची गडबड सुरू होती . सकाळी दहा ते बारा या वेळेत अर्ज सादर करणे , बारा ते सव्वाबारा या दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी करून ती निर्वेध असल्याचा निर्वाळा पीठासन अधिकाऱ्यांना देणे व नगराध्यक्षांनी प्राप्त वैध अर्जाची घोषणा करणे अशी प्रक्रिया राबविली जाणार आहे . ही निवड गुरूवारी दि ५ रोजी होणाऱ्या विशेष सभेत केली जाणार असून या पंचवार्षिक मधील ही उपनगराध्यक्ष निवड शेवटची असणार आहे .
उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक मनोज शेंडे यांची निवड निश्चित मानली जात आहे . या निवडीची घोषणा अद्याप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेली नसली तरी उपनगराध्यक्ष पदी मनोज शेंडेच असणार असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे . त्यामुळे शेंडे यांच्या नावाची घोषणा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे केव्हा करणार याची पालिका वर्तुळात जबरदस्त उत्सुकता आहे .