सातारा पालिकेच्या लाचखोर अधिकारी व कर्मचारी चौकशी प्रकरणातील मूळ तक्रारदार व यशश्री एंटरप्रायजेस चे प्रकल्प व्यवस्थापक अमित शिंदे यांनी सादर केलेले पुरावे रेकॉर्डवर घेण्यास चौकशी अधिकारी डॉ के आर . सिंघल यांनी चौकशी प्रक्रियेदरम्यान नकार दिला .
या प्रकरणात आरोपींनी चौकशी अधिकाऱ्याशीच तडजोड केल्याचा आरोप करत शिंदे यांनी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे दाद मागितली आहे . ८ जून २०२० रोजी पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना दोन लाख तीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते . आरोग्य निरिक्षक टोपे, कायगुडे व यादव यांची नावे चौकशीत समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती . निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ के आर सिंघल यांच्याकडून तत्कालीन आरोग्य निरिक्षकांची चौकशी करण्यात येत आहे . या प्रकरणातील मूळ तक्रारदार अमित शिंदे यांनाही गुरुवारी सर्व पुराव्यानिशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र चौकशी दरम्यान सिंघल यांनी शिंदे यांनी पेनड्राईव्ह मधील तत्कालीन संभाषणाचे ध्वनी मुद्रण रेकॉर्डवर घेण्यास नकार दर्शविला . शिंदे यांनी कारण विचारताच सिंघल यांनी यशश्री एंटरप्रायजेसचे प्रोपरायटर मनवे यांना हजर करावयास सांगून तुमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही अशी भूमिका घेतली . मात्र चौकशी प्रक्रियेदरम्यान चौकशी अधिकाऱ्याने च मूळ तक्रारदाराचे पुरावे नाकारल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे . तत्कालीन संशयित आणि चौकशी अधिकारी यांच्यातच काही तडजोड झाल्याचा आरोप अमित शिंदे यांनी करून मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दिली आहे . कायगुडे यांचे राजकीय लागेबांधे असल्याचे लक्षात घेता ही चौकशी निष्पक्ष व्हावी अशी मागणी अमित शिंदे यांनी सामान्य प्रशासनाच्या सचिवांकडे केली आहे .