6 डिसेंबर 2019 रोजी साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलला 122वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले. शालेय समितीचे चेअरमन अमित कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आयोजित केल्या गेलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे हे तिसरे वर्ष होते.
रौप्यमहोत्सवी वर्ष असलेल्या 1994 – 95 च्या बॅचने संपूर्ण मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आणि नेटके संयोजन केले. प्रथम शाळेचे संस्थापक गुरूवर्य देवधर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज आणि संस्थापक लो. टिळक, आगरकर, चिपळूणकर, नामजोशी, आपटे प्रभृतींच्या प्रतिमेचे पूजन माजी विद्यार्थी तसेच अमित कुलकर्णी, अनंत जोशी, माधव सारडा यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.
भारलेल्या वातावरणात शाळा सवंगडी एकमेकांशी हितगुज करीत होते. एकमेकांना जुन्या टोपण नावाने एकेरी संबोधत एकमेकांची चेष्टा मस्करी केली जात होती. मेळाव्यास न आलेल्या आपल्या सवंगड्यांची आपुलकीने आठवण काढली जात होती. एखादा सवंगडी उशिरा सामील झाला की, त्याचे आलिंगन देऊन स्वागत केले जात होते. विविध गट एकमेकांच्या सुना- नातवंडांची, मुलाबाळांची, नोकरी-करिअरची, चालू असलेल्या शिक्षणाची आपल्या वयोगटानुसार चौकशी करत होते. ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांना तरुण झाल्यासारखे वाटत होते, तर अलिकडील माजी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याची हुरहुर वाटत होती. शाळेत अनुभवलेली आपुलकी बाहेर क्वचितच अनुभवाला येते, अशी भावना विद्यार्थी व्यक्त करत होते. आपल्यातून गेलेल्या मित्र मैत्रिणींविषयी हळहळ व्यक्त होत होती. त्यांच्या कुटुंबीयांना काही मदतीची आवश्यकता आहे का याची चौकशी केली जात होती.
माजी शिक्षकांच्या सत्कार समारंभाने या कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठला.
या कार्यक्रमात शालेय समितीचे चेअरमन अमित कुलकर्णी, सदस्य अनंत जोशी. शालाप्रमुख सुनिल शिवले, माजी विद्यार्थी समितीचे माधव सारडा आदि मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक माजी शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये सांगितली जात असताना विद्यार्थी उत्स्फूर्तपणे दाद देत होते. 1994 – 95 च्या विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकांचा सत्कार केला. याप्रसंगी या वर्षात निवर्तलेल्या माजी शिक्षकांना आदरांजली वाहण्यात आली. दुग्धपानाचा आनंद घेत पुनःपुन्हा भेटण्याच्या आणाभाका घेत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झटणाऱ्या 1994-95 च्या विद्यार्थ्यांचे, उपशालाप्रमुख, पर्यवेक्षक आणि शिक्षकांचे आभार मानले.