सध्या कोरोना महामारीने गेले वर्षभर ग्रामिण आणि शहरी भागातील सर्व नागरीक त्रस्त आहे. लॉकडाउन, अनलॉक प्रकाराचा सकारात्मक/नकारात्मक परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडला आहे. बहुतांशी सर्वच क्षेत्रातील व्यावसायिक, आणि मुख्यत्वेकरुन शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. अश्या परिस्थितीत, विद्यमान आधुनिक काळात वीज जोडणी अत्यावश्यक आहे. अशी वीज जोडणी, वीजबिल थकबाकीमुळे तोडण्याची कारवाई वीज वितरण कंपनीकडून केली जात आहे. वीज कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देवून,तोडण्याऐवजी जोडण्याचे काम चांगले केलेले असताना, असा प्रकार होत असेल तर ते निश्चितच वेदनादायी आहे. त्यामुळे थकबाकीबाबत
टप्याटप्याने रक्कम भरण्याचा निर्णय घेवून कंपनीने महामारीने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा द्यावा.अन्यथा संघर्ष अटळ आहे असा गर्भित इशारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
दिल्ली सारख्या राज्यामध्ये वीजबिल काही युनिटपर्यंत पुर्णतः माफ आहे. तेथे ठराविक युनिटपर्यंत वीज मोफत पुरवली जाते. त्या राज्याचे प्रतियुनिट दर देखिल खुप कमी आहेत. देशात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही निश्चितच अग्रेसर राहीली आहे. कोरोना काळात देखिल वीज कंपनीच्या कर्मचा-यांनी अखंड वीज पुरवठा करण्याचे वाखाणण्यासारखे काम केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा देखिल सुरळीत राहीला.महाराष्ट्राची वीजेच्या गरजेपैकी जवळजवळ निम्मी वीज सातारा जिल्हयात तयार होत आहे ही वस्तुस्थिती आहे. कोरोना महामारीने गेले संपूर्ण वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कौटुंबिक गरजा भागवताना जवळजवळ सर्वांचीच तारेवरची कसरत होत आहे. आज काल वीज पुरवठा अत्यावश्यक झाला आहे. कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाईन चालु आहे. जर वीज पुरवठा नसेल तर त्या घरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
नुकसानही होणार आहे.सध्या शहरी भागासह,ग्रामिण भागातील सर्व कुटुंबातील बहुतांशी कामे ही बीज पुरवठयावर सुरुआहेत.
कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात वीज कंपनीने, वीज बिलांचे सुध्दा वाटप केलेले नव्हते. सदरची तीन चार महिन्यांची वीज बिले एकत्रितपणे कालांतराने दिल्याने ती भरताना, कौटुंबिक आर्थिक नियोजन बारगळलेले आहे. तसेच एकत्रित वीज बिल दिल्याने एकूण युनिट्स चा युनिट दर लागला गेल्याने,त्या युनिटसंख्येनुसार वीज दर आकारुन बीले दिली गेल्याची उदाहरणे आहेत. यामध्ये वीज ग्राहकाचे दुहेरी नुकसान झाले आहे.
अश्या परिस्थितीत, थकीत वीज बिल टप्याटप्याने भरणेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा.किंवा याबाबत धोरणात्मक निर्णय मंडळाने घेतला पाहीजे. कोरोना सारख्या संसर्गजन्य जागतिक महामारीत जर बीजथकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार असेल तर ते कदापि मान्य करता येणार नाही. अश्यावेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजुने ठाम उभे राहणार आहोत. तसेच अश्या कारवाईत कोणा कोणाची वीज तोडली याचा आढावा घेवून, त्याबाबतचा जागेवरच सोक्ष मोक्ष त्या त्या वेळी लावताना संघर्ष अटळ ठरेल गर्भित इशारा देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.