बारामतीकरांची मक्तेदारी मोडून काढा आ गोरे

261
Adv

आपण यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार समजायचं, त्यांच्याच सातारा जिल्ह्यात आपला पक्ष त्यांनी वाढवला. पण, ४० वर्षे पाठीशी राहिलेल्या सातारा जिल्ह्याला बारामतीकरांनी काय दिलं? कर्मवीर, यशवंतराव यांनी उभारलेल्या संस्थांबरोबरच त्यांनी औंधचं संस्थानही ताब्यात घेतलं. सारी विकासकेंद्रे बारामतीला नेली. आता त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची वेळ आली आहे, असा घणाघात भाजपा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केला.

भिलार (ता. महाबळेश्वर ) येथे आयोजित सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणी बैठक आणि दोन दिवशीय अभ्यासवर्ग शिबिराच्या समारोपप्रसंगी आ. जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, रवी अनासपुरे उपस्थित होते.

ज्या योजनेतून अनेकांचे जीव वाचले, अनेकांच्या संसाराला हातभार लागला, ती मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना बंद करणारा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला, असा टोला उद्धव ठाकरे यांना आ. गोरे यांनी लगावला. ते म्हणाले, ना. देवेंद्र फडणवीस यांनी अथक परिश्रमातून तयार केलेला अर्थसंकल्प वाचताना उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे सुतकी चेहरे पाहण्यासारखे होते. आम्ही बहुमताने निवडून आलो. पण, सत्तेच्या बाहेर रहावं लागलं. गद्दार बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं. आम्हाला वेदना झाल्या. पण, आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार यादृष्टीने काम सुरू आहे. आपणही आता कामाला लागू, असे आ. गोरे म्हणाले.

पवारांनी संस्थानिक बँका, सभासद ताब्यात ठेवले आहेत. आपल्या ताब्यात काय आहे? त्यांच्या बालेकिल्ल्यातील सातारा जिल्हा बँकेने आजपर्यंत एकही नवा सभासद केला नाही. आपली लढाई विचारांची आहे आणि ती राष्ट्रवादीबरोबर आहे. त्यांचा पाडाव करण्याची आपली मानसिकता असायला हवी, असेही आ. गोरे म्हणाले.

एवढ्या मोठ्या नेत्यांवर का बोलता? असं मला अनेकदा विचारलं जातं. पण, मी का कुणाला भ्यावं. माझा अपघात झाला तो बारामतीनं केला की फलटणने केला याच्या चर्चा सुरूझाल्या. एका जयकुमारने लोकांसाठी बलिदान दिलं तर बिघडलं कुठं? असा सवाल आ. जयकुमार गोरे यांनी केला.

ना. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत अनोखी ऊर्जा आहे. प्रत्येक संकटावेळी ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रतिकुल परिस्थितीत आपल्या पाठी उभा राहणारा पक्ष आपला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात गेल्यावर सन्मानानं ताठ मानेने आपला कार्यकर्ता आपलं काम करूनच परत येईल, अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे, असेही ते म्हणाले. समृध्दी महामार्ग चकाचक होत असताना आमच्याही रस्त्यांकडे पहा असं मंत्री नितीन गडकरी यांना बोलताच त्यांनी लगेच तशा सूचना दिल्या, असे आ. गोरे यांनी सांगितले. शासनाच्या विविध तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सवानी कामाला लागावे. आगामी काळात जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्याबरोबरच जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूयात, असे आवाहन आ. गोरे यांनी केले.

फलटणकरांनी कायम बारामतीकरांशी गोड बोलून सत्तेची भूक भागवली. पण, त्यांच्या सत्तेच्या बदल्यात जिल्ह्यातलं पाणी तिकडे पळवलं. हे पाप फलटणकरांनी जिल्ह्याच्या माथी मारलं, असे आ. गोरे शेवटी म्हणाले. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, भारतीय जनता पार्टी देशातील एक नंबरचा पक्ष असून आता आपल्या जिल्ह्यात भाजपा एक नंबरचा पक्ष करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे. ही विचारांची लढाई व संघर्ष असून जो जो शकुनीमामाबरोबर गेला तो संपलाच म्हणून समजावे. या शिबिरात आ. शिवेंद्रराजे भोसले, मकरंद देशपांडे, धैर्यशील कदम, रवी अनासपुरे यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना विचारांची शिदोरी दिली. यावेळी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिराची जबाबदारी महाबळेश्वर तालुक्यातील भाजपा कार्यकत्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Adv