बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना विशेष निधी देणार खा उदयनराजे

57
Adv

कोरोना मुळे गेल्या सुमारे ९-१० महिन्यांपासून बळीराजासह ग्रामिण भागातील सर्वच जनता त्रस्त आहे. वैद्यकिय आणि आरोग्य कर्मचारी,पोलिस प्रशासन,लोकप्रशासन म्हणजेच सर्व सरकारी,निमसरकारी विभागातील कोविड योद्ध्यांवर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव आहे.

अश्या परिस्थितीत, गांवपातळीवर ईर्षा,चढाओढ,किरकोळ कारणे यांना तिलांजली देवून, सातारा जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे उदिष्ट ठेवावे, बिनविरोध होणा-या सातारा जिल्हयातील ग्रामपंचायतींना राज्यातुन आणि विशेष करुन केंद्रातुन, लोकसंख्येनुसार विशेष निधी उपलब्ध करुन विकासात्मक प्रोत्साहन देण्याकरीता आम्ही कटिबध्द राहु, याकरीता सर्वांच्या सहकार्याने गावातील जेष्ठांनी मार्गदर्शकाची आणि युवाशक्तीने त्याची अंमलबजावणी करण्याची भुमिका बजावून, गावाच्या एकीचे बळ देशाला दाखवून दयावे असे आग्रही आवाहन राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
ग्रामपंचायती हा ग्रामविकासाचा पाया समजला जातो,तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या लोकशाहीचा पाया संबोधल्या जातात. गावामध्ये आज देखिल निवडणुका सोडून अन्य बाबतीत गट-तट बाजुला ठेवून, यात्रा-जत्रा आणि गावाच्या विकासाचे उपक्रम राबविले जातात. ग्रामिण भागात आज देखिल केवळ कष्टकरी, शेतकरीवर्गामुळे माणुसकी टिकून आहे, तथापि निवडणुका आल्या की, ईर्षा-चढाओढ आणि मी मोठा का तु मोठा यामधुन घमासान घडते, प्रसंगी आख्खं गांव वेठीस धरले जाते आणि पुढे किमान पाच वर्षे तरी हा
राजकीय तणाव विकोपाला जातो. गावाचा विकासाला काही प्रमाणात का होईना खीळ बसतेच परंतु त्याही पेक्षा गांवातील निकोप वातावरण गढुळ होते याची प्रचिती अनेक ठिकाणी दिसून आली आहे.

निवडणुका या लोकशाहीचा पाया समजल्या जात असल्या तरी त्या निकोप स्पर्धात्मक होणे हे अपेक्षित असते, तथापि अलिकडच्या काळातील निवडणुका पाहील्या तर जवळजवळ सर्वच गावांत दोन उभे गट पडलेले दिसुन येतात. तसेच कोरोनाची पार्श्वभुमी पहाता, ग्रामिण भागातील जनता लॉकडावून, अनलॉक या प्रक्रीयेमुळे मेटाकुटीला आली आहे. इच्छा असुनही काही प्रमाणात का होईना कोरोनाच्या सुरु असलेल्या काळात जनतेवर बंधने लादली गेल्याने, ग्रामिण जनता विवंचनेत आहे. अश्या परिस्थितीत जिल्हयातील सुमारे
९०० ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणुका गावपातळीवरील असल्याने, त्याचा धुरळा गावातील प्रत्येक घरटी उडणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे.

त्याऐवजी हेवेदावे विरहित सर्वांच्या वैचारीक सहकार्यातुन, बिनविरोध निवडणुका झाल्यास, त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसतील आणि गावाच्या एकी ब्दारे गांव करील ते राव काय करील ही म्हण सार्थ ठरविणा-या निवडणुका संपूर्ण देशाला नवी दिशा देणा-या ठरतील. त्यामुळे हेवेदावे बिरहित बिनविरोध निवडणुका हे मर्म प्रत्येक कार्यकर्त्यांने जाणुन घेवून, आपल्या गांवच्या हितासाठी साध्य करावे असे आवाहन
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

Adv