शेती हा जिल्ह्याच्या अर्थकारणातील महत्त्वाचा कणा असून शेती संबंधीच्या समस्या सोडवून शेतीची पर्यायाने शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी घडविण्यासाठी जिल्ह्यातील शेतीसंबंधीच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्यावर आपला भर असणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद कृषी समितीचे नूतन सभापती मंगेश धुमाळ यांनी केले. कृषी सभापती म्हणून निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
दिनांक ९ जानेवारी रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषद विविध समितीच्या सभापती निवडीमध्ये पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे सदस्य मंगेश धुमाळ यांची कृषी सभापती म्हणून निवड करण्यात आली. त्यानिमित्त परिसरातील कार्यकर्त्यांच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. गेली अडीच वर्षे जिल्हा परिषद सदस्य व त्यापूर्वी कार्यकर्ता म्हणून परिसरात केलेल्या व्यक्तिगत व सामूहिक हिताच्या विकासकामांची दखल घेत पक्षाने सोपविलेली कृषी सभापती पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी परिसरातून आलेल्या शेतकरी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या शेती विषयीच्या समस्या व काही नवीन संकल्पना जाणून घेतल्या.
दरम्यान कृषी सभापती म्हणून जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ यांच्या रूपाने पिंपोडे बुद्रुक सारख्या अवर्षणग्रस्त परंतु शेती उत्पादनात अग्रेसर गटाला संधी दिल्याने परिसरातील जनता शेतीक्षेञाच्या भरीव विकासाबाबत आधिक आशावादी आहे.
———————————————
जिल्ह्यातील बहुतांशी परिसरातील शिवार रस्ते निर्मीती व दुरुस्ती, सामुहिक व व्यक्तिगत लाभाच्या योजनांची त्वरित कार्यक्षम अंमलबजावणी,कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व शेतीपूरक व्यवसाय यासारख्या बाबींवर विशेष भर देऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे
मंगेश धुमाळ
कृषी सभापती
—————————————–+-