मी पुन्हा येईन असं मी निश्चितच म्हणालो, पण वेळ सांगितली नव्हती, असा डायलॉग विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना मारला. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना उद्देशून, भुजबळ साहेब, इतकं घाबरु नका, बरं पुढच्या वेळी आलो, तर तुमच्यासकट येतो बास? कारण राजकारणात काहीही अशक्य नाही, अशी कोपरखळी फडणवीस यांनी मारताच सभागृहात एकच हशा पिकला. विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात फडणवीस बोलत होते.
उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करण्याची इच्छा होती, मात्र दुर्दैवाने ती करता आली नाही. गेली अनेक वर्ष ज्यांच्यासोबत काम करत आहोत, त्या उद्धव ठाकरेंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा आहेत, काही कारणाने संबंध मागेपुढे झाले, पण राजकारणापलिकडे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मनात ज्या काही योजना तयार केल्या आहेत, जे जनतेच्या हिताचं असेल, त्या पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून निश्चित सहकार्य करु’ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
काल जे विरोधात होते ते एकत्र आले आहेत. आम्ही 70 टक्के जागा जिंकून मेरिटमध्ये आलो. परंतु राजकारणात केमिस्ट्री नाही, तर पॉलिटिकल अरिथमॅटिक (राजकीय अंकगणित) चालते, त्यामुळे 40 टक्के मिळालेले तिघे एकत्र आले, त्यांनी 120 केले आणि लोकशाहीमध्ये त्यांनी मेरिटची जागा घेतली, असा टोला फडणवीसांनी लगावला.