कोविड च्या पत्रावर मुख्याधिकारी बापट यांची पहिली स्वाक्षरी

49
Adv

करोनाच्या संक्रमणामुळे जिल्हा रुग्णालयात सात रुग्णांचा मृत्यू झाला . या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानगीच्या पत्रांवर सह्या करून सातारा पालिकेचे नूतन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी साताऱ्यात कामकाजाची सुरवात केली .

बुधवारी सायंकाळी सव्वाचार वाजता मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे आगमन झाले . पालिकेचे मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील, सहाय्यक लेखापाल हिम्मत पाटील, लेखापाल आरती नांगरे यांनी बापट यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . बापट यांच्या येण्याची वाट प्रशासनाचे कर्मचारी सकाळपासूनच पहात होते . मुख्याधिकारी बापट यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नगरपरिषद संकलन अधिकारी सचिन पवार यांची भेट घेतली व सायंकाळी सव्वाचार वाजता त्यांनी पालिकेत येऊन मुख्याधिकारी पदाची सूत्रे हातात घेतली . पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांशी त्यांनी नेहमीच्या शैलीत संवाद साधत कामाला सुरवात केली . जिल्हा रुग्णालयात करोनाच्या संक्रमणामुळे सात रुग्णांचा मृत्यू झाला . त्यांच्या माहुली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावयाच्या आवश्यक परवानगी पत्रावर अभिजीत बापट यांनी सह्या करून कामकाजाला सुरवात केली . सातारा शहरातील कंटेन्मेंट झोन, पालिकेकडून होणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेऊन सातारकरांच्या सुरक्षिततेची त्यांनी स्पष्ट ग्वाही दिली .लॉक डाऊनच्या काळात जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे कठोरपणे पालन केले जाईल, कोणालाही तक्रारीची संधी दिली जाणार नाही असे बापट यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले .

आरोग्य सेवांचे बळकटीकरण, करोनाच्या माहिती संकलनात समन्वय व सुसूत्रता, घटलेली वसुली, चतुर्थ वार्षिक पाहणीची प्रक्रिया सुरु करणे, बेशिस्त कर्मचाऱ्यांना चाप लावणे, लाचखोर आरोग्य निरीक्षकांच्या विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करणे, विसर्जन तळ्यांच्या आवश्यक निविदा काढणे, इं महत्वाच्या कामांचा निपटारा अभिजीत बापट यांना करावयाचा आहे . सातारा पालिकेत यापूर्वी मी काम केले आहे त्यामुळे मी येथे नवखा नाही, कोणतेही काम प्रलंबित ठेवले जाणार नाही शिवाय सातारकरांना सर्व सेवा विहित मुदतीत दिल्या जातील असे सष्ट आश्वासन अभिजीत बापट यांनी दिले .

Adv