गडचिरोली वरुन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली सातारा येथे झाल्यानंतर त्यांनी आज सातारच्या माजी जिल्हाधिकारी आणि आता अतिरिक्त आयुक्त पुणे महसूल विभाग श्वेता सिंघल यांच्याकडून सातारा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतला.
प्रारंभी माजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, किर्ती नलावडे, संगीता चौगुले, अश्विनी जिरंगे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते, सातारच्या तहसीलदार आशा होळर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह हे मुळ दिल्ली येथील असून त्यांचे शिक्षणही दिल्लीत झाले. श्री. सिंह हे 2012 च्या बॅचचे आय.ए.एस. आहेत. यांनी यापूर्वी नागपूर येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम केले आहे. रामटेक जि. नागपूर येथे प्रांताधिकारी, सिंधूदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.