खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान सेवा सुरू करण्यात आली आहे . दररोज रात्री साडेसात ते नऊ या दरम्यान हॉस्पिटल्सच्या आवारात शंभर फूड पॅकेटचे वाटप करण्यात येत आहे .
या अन्नदान योजनेचा रुग्णाच्या नातेवाईकांना फायदा होत असून आपसूकच त्यांच्याकडून समाधानाचे सूर उमटत आहे . करोनाच्या सांसर्गिक महामारीचा सर्व पातळीवरून मुकाबला सुरू आहे . यामध्ये अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत . जंबो हॉस्पिटल्समध्ये रुग्णाला दाखल करण्यासाठी नातेवाईकांना बरीच यातायात करावी लागत आहे . हे करताना सायंकाळी उशिरा येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचे प्रचंड हाल होत होते . ही अडचण ओळखून साताऱ्याचे प्रसिद्ध व्यावसायिक व कट्टर श्रीमंत छत्रपती उदयनराजे समर्थक सागर भोसले यांनी प्रायोगिक तत्वावर आठ दिवसा पूर्वी अन्नदान सेवा सुरू केली . दाल- राईस चे शंभर फूड पॅकेट तयार करून ते जंबो हॉस्पिटल्सच्या आवारात सायंकाळी साडेसातच्या पुढे वाटले जात आहेत . सागर यांचे सहकारी गोलू साळुंखे यांनी ही या उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला . ही योजना त्यांनी सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या कानावर घातली . उपनगराध्यक्षांनी सुद्धा या योजनेचा एक महिन्याचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली . प्रसिद्ध उद्योजक संग्राम बर्गे सुध्दा यांनी सुध्दा या अन्नदान योजनेत मोलाचा वाटा उचलला आहे .
चौकट :
अन्नदान योजनेला छ उदयनराजेंचा पाठिंबा
करोनाच्या महामारीत साताऱ्यातील गरजूंना मदत करण्याची कोणतीही संधी खासदार उदयनराजे भोसले सोडत नाही . शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांना त्यांनी अडीच हजार रुपयांची मदत जाहीर केली . अन्नदान योजनेलाही उदयनराजे यांनी उचलून धरल्यावर उदयनराजे मित्र समूहाच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी ही योजना तत्काळ अंमलात आणली . सागर भोसले यांच्या संकल्पनेला उदयनराजे यांचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने सातारा तालुक्यातून अनेक मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत