सातारा – कागल महामार्ग दुरूस्तीसाठी 558 कोटीचा निधी छ उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश

399
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह दुरुस्तीच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 558 कोटी 24 लाख एवढा भरघोस निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारणीसह महामार्ग दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांचा महामार्गावरील प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे. या कामाची माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे .

कागल ते शेंद्रे महामार्गाच्‍या पटृयातील पाच धोकादायक ठिकाणांच्‍या (ब्‍लॅक स्‍पॉट) दुरुस्‍ती व सुधारणांसाठी तब्‍बल 646 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामधील पाच पैकी चार ठिकाणे ही सातारा जिल्‍हयातील असून त्‍यामध्‍ये मलकापूर (ता. कराड) येथील नव्‍या उड्डाणपूलासाठी 459 कोटी 52 लाख रुपये, मसूर फाटा येथील अंडर पास पूलासाठी 47 कोटी 18 लाख, इंदोली फाटा अंडर पास पूलासाठी 45 कोटी 35 लाख आणि काशीळ फाटा येथे महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूस दीड कि.मी. अंतराच्या सर्व्‍हीस रस्त्यासाठी 6 कोटी 19 लाख निधीची तरतूद करण्‍यात आलेली आहे. सदर कामांची अंमलबजावणी सातारा-कागल महामार्गाच्‍या सहापदरीकरण कामाबरोबरच करण्‍यात येणार आहे . खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून त्यांनी मागणी केलेल्या सदर कामांसाठी भरघोस निधी मंजूर झाला आहे.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी सातारा जिल्हयातील प्रलंबित विकास कामांसाठी केंद्राकडून भरघोस निधी आणण्याचा धडाका लावला आहे . पुणे बेंगलोर महामार्गावरील सातारा ते कागल या दरम्यान असणाऱ्या ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीसाठी उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांच्याकडे कामाचा पाठपुरावा केला होता

सातारा ते कागल अशा 132 कि.मी. अंतरामध्‍ये मार्गाची झालेली दुर्दशा, त्यामुळे वहातूकीसाठी निर्माण होत असलेली धोकादायक परिस्थिती तसेच या पटृयात होणारे अपघातांचे प्रमाण आणि त्यामध्ये नागरिकांचे जाणारे नाहक बळी याबाबत त्यांनी ना.गडकरी यांना सविस्तर माहिती चर्चेदरम्यान दिली होती . उदयनराजे यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन ना.गडकरी यांनी दि. 22 सप्‍टेंबर 2020 रोजी पत्र लिहून त्यांना आपल्‍या मागणीप्रमाणे सातारा-कागल महामार्गावरील प्रमुख पाच धोकादायक व अपघात प्रवण ठिकाणे निश्चित करुन त्‍याची दुरुस्‍ती व सुधारणा करण्‍याचे काम हाती घेतले असल्याचे कळविले होते. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्या व सूचनांना ना.नितीन गडकरी यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दर्शवून या मागण्यांची सोडवणूक त्वरित केली जाईल असे त्यावेळी आश्वासित केले होते.

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गा संदर्भात केलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष्य देवून मोठा निधी उपल्ब्ध करून दिल्याबद्दल ना. गडकरी यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी आभार मानले आहेत. दरम्यान जिल्‍हयातील राष्‍ट्रीय व राज्‍य महामार्गावरील इतर अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करुन त्‍याबाबत केंद्रीय रस्‍ते वहातूक मंत्रालयाला कळवण्यात यावेत. त्‍याबाबतही तातडीने निर्णय घेण्यात येथील असे ठोस आश्‍वासन ना.गडकरी यांनी उदयनराजे यांना दिले आहे . त्यासाठी लवकरच जिल्‍हाधिकारी, पोलीस अधिक्षक व आर.टी.ओ. अधिका-यां सोबत बैठक घेऊन जिल्‍हयातील सर्व अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्‍याचे काम हाती घेणार असल्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कळविले आहे .

Adv