
भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा कार्यालयांमध्ये खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फोटो झळकले आहेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांच्या पुढाकाराने हे फोटो झळकल्याची चर्चा आहे खा उदयनराजे समर्थक व धैर्यशील कदम यांच्यामध्ये उभा वाद पेटलेला असताना जिल्हा भाजप एकसंघ दाखवण्याची राजकीय खटपट सुरू झाली आहे
माणचे आमदार जयकुमार गोरे हे जिल्हाध्यक्ष असताना विसावा नाका येथे सातारा जिल्हा भाजपचे विस्तारित कार्यालय सुरू करण्यात आले .या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नढ़ढा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः जयकुमार गोरे यांची छायाचित्रे कार्यालयात झळकवण्यात आली होती .हे कार्यालय जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने झाल्यामुळे त्यांच्या निर्देशाप्रमाणे कार्यालयाची सजावट करण्यात आली होती .सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व आमदार जयकुमार गोरे यांच्यात राजकीय वाद पेटलेला आहे .त्यावेळी उदयनराजे यांना तिकीट दिले जाऊ नये याकरिता जयकुमार गोरे यांनी उदयनराजे विरोधी भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता .धैर्यशील कदम यांनी उदयनराजे समर्थकांचा बगलबच्चे असा उल्लेख केल्याने तीव्र नाराजी पसरली .भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण धस्के यांनी पत्रक काढून या प्रकाराचा निषेध केला होता .जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्रे का नाहीत ? असा सवाल केला असता त्यांनी या कार्यालयात मी कोणताही बदल केला नाही कार्यालयाची सजावट ही आमदार जयकुमार गोरे यांच्या काळातील आहे असे उत्तर दिले होते .
2024 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी आश्चर्यकारकरीत्या विजय खेचून आणला होता .त्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मोठी भूमिका बजावली त्यामुळे भाजपच्या कार्यालयात या दोघांचेही फोटो नाहीत अशी सल राजे समर्थकांना जाचत होती .उदयनराजे समर्थक व धैर्यशील कदम यांच्यातील राजकीय नाराजी संपलेली नाही असे असताना शुक्रवारी जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांच्या पुढाकाराने कार्यालयांमध्ये खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची छायाचित्रे झळकली .त्याची छायाचित्रे सोशल मिडियावर प्रदर्शित झाल्यावर भाजपच्या वरिष्ठांकडून डॅमेज कंट्रोल चे निरोप आले की काय ? अशी विचारणा होऊ लागली होती .
विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने जोरदार सातारा जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे कोठेही अंतर्गत वाद दूर किंवा राजकीय हेवेदावे असू नयेत असे प्रदेश कार्यकारिणीचे निर्देश आहेत असे असताना धैर्यशील कदमच राजे गटाच्या रडारवर आल्यामुळे धुसफुस संपायला तयार नाही . खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात आल्यानंतर आगामी काळात काय राजकीय हालचाली होणार याची प्रचंड उत्सुकता आहे