कोविड हॉस्पिटलचा परिसर सातारा पालिकेकडून अतिक्रमण मुक्त

56
Adv

सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सोमवारी जम्बो कोविड हॉस्पिटलसमोरील रिकामी खोकी व टपऱ्या हटविण्यात आल्या. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण पथकाचे निरीक्षक प्रशांत निकम यांनी दिली.

जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या इमारतीत कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलसमोर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत करोना चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता फुटपाथवरील हातगाड्या हटविणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून फूटपाथवरील सर्व अनधिकृत टपऱ्या सोमवारी हटविण्यात आल्या. तर काही जप्त करण्यात आल्या. कारवाईवेळी काही टपरीधारकांनी स्वत:च आपल्या टपऱ्या तत्काळ काढून घेतल्या.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली असली तरी शहरात बोकाळत चाललेल्या इतर अतिक्रमणांचा विषयही गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून राजवाडा, मंगळवार तळे मार्ग, तांदूळ आळी, खणआळी, कर्मवीर भाऊराव पाटील पथ, तहसील कार्यालय परिसरातील रस्ते व फुटपाथ विक्रेत्यांकडून काबीज करण्यात आले आहेत. या अतिक्रमणांवरही पालिकेने कारवाईचे धारिष्ट्य दाखवण्याची मागणी होत आहे.

Adv