सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाकयावरील टोलच्या दरात सुमारे 5 टक्के केलेली टोल दरवाढ ही अन्यायकारक आणि प्रवासी आणि संबंधीतांच्या संयमाचा अंत पहाणारी आहे. वास्तविक या रस्त्याचे काम सन 2013 मध्ये पूर्ण होणार होते. मुळची मुदत संपूनही सुमारे 8 वर्षे झाली तरी काम पूर्ण झालेले नाही म्हणूनच 5 टक्के वाढ करण्याऐवजी जुन्या टोलदरात 5 टक्कयापेक्षा जास्त टोल करकपात करावी अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.
याबाबत जलमंदिरपॅलेस येथून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना अनेक गैरसोयींचा सामना प्रवाश्यांना करावा लागत आहे. असलेले सेवा रस्ते अत्यंत खराब आहेत. काही ठिकाणी सेवा रस्ते आहेत का नाहीत हे देखिल समजत नाही.
रस्त्यांवरील खड्डयांची तर मोजदाद ही करता येत नाहीत इतके असंख्य खड्डे आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खरंच आहे का
असा प्रश्न वाहनचालकांना आणि प्रवाशांना पडत असतो. दिशादर्शक- स्थलदर्शक फलकांची वानवा आहे. काही वेळा
अपरिचित वाहनचालकांला एखादे गांव कधी आपण मागे टाकले हे देखिल कळत नाही.ट्रक ले-बाय, शौचालय सुविधा इत्यादी बाबी तर सुरुवातीपासूनच गायब आहेत. शेजारील कर्नाटक राज्यातील याच राष्ट्रीय महामार्गावरुन आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यांपेक्षा कमी टोल दर देवून, प्रवास करणारे वाहनचालक आणि प्रवाशी हे सातारा पुणे प्रवासा दरम्यान प्रत्येक असुविधेबाबत आणि खडयांबाबत अक्षरश: लाखोली वहात असतात. या व अश्या सारख्या अनेक सुविधांची असलेल्या वानवा लक्षात घेता, सध्याच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ऑथेंरिटी ऑफ इंडियाने) आणि टोल चालवणा-या रिलायन्स व्यवस्थापनाने टोल दरवाढ करुन, प्रवाशी आणि वाहनचालक/धारकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांनी केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी
तसेच नुसती दरवाढ मागे न घेता, जुन्या दरात 5 टक्यापेक्षा जास्त रक्कमेची टोल करकपात करावी अशी मागणी नागरीक- प्रवाशी आणि वाहनचालकांच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.