जिकडे भेळ तिकडे मोहिते पाटलांचा खेळ!

69
Adv

श्रीपूर (माळशिरस) : जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला संपवून टाकण्याची भाषा करणारे, आमची लढाई थेट पवारांशी आहे असे म्हणणारे विजयसिंह मोहिते पाटील आज मी राष्ट्रवादीच आहे असे सांगत आहेत, हे आश्‍चर्यकारक आहे. जिकडे भेळ तिकडे खेळ असा हा प्रकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली आहे. 

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना आपण अद्याप राष्ट्रवादीतच असल्याचे विधान माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले होते. या विधानावर सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. या संदर्भात बोलताना चाकणकर यांनी मोहिते-पाटील यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, ” राष्ट्रवादीत होते तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटील कुठे होते. मोहिते पाटील राष्ट्रवादीत असते तर, पक्षाच्या प्रचार सभांना आले असते. पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला असता. पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणायला मदत केली असती मात्र, असे घडले नाही. ज्यांनी पक्षाला साथ दिली नाही. पक्षाच्या विरोधात प्रचार केला तेच आज, मी राष्ट्रवादीतच आहे असे सांगत आहेत. पडत्या काळात ज्यांनी पवार साहेबांना साथ दिली तेच खरे साहेबांचे शिलेदार आहेत. ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले अशी मंडळी आता सत्ता परिवर्तनानंतर राष्ट्रवादीत असल्याचे सांगत आहेत. साहेबांवर आणि पक्षावर त्यांची किती निष्ठा आहे हे राज्यासह माळशिरसकरही चांगले ओळखतात.”  

Adv