कार्यकर्त्याला नेता करणारा लोकनेता म्हणजेच मुंडे साहेब

192
Adv

मराठवाड्याचे भुमीपूत्र, महाराष्ट्राचे लोकनेते, देशाचे ग्रामविकास मंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची आज दि.०३ जुन २०२० रोजी पुण्यतिथी. गेल्या ६ वर्षापूर्वीचा हा दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. ज्यांनी मला राजकीय क्षेत्रात घडविले, नेतृत्व करण्याची संधी दिली, संघर्ष कसा करावा आणि गोरगरीबांना न्याय कसा मिळवून द्यावा, याची शिकवण देणार्याण या कर्तृत्वान लोकनेत्याला विसरणे कदापी शक्य नाही.
सुरुवातीच्या काळात सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करीत असताना रमेश तू जे काम करतोस त्या कामाला मीच न्याय देवू शकतो असे सांगून भारतीय जनता पार्टीत ये असे मुंडे साहेबांनी मला बोलावून घेवून बोलून दाखविले. स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची काम करण्याची पद्धत सर्व सामान्यांसाठी संघर्ष करण्याची धमक आणि ग्रामीण जनतेशी कायम ठेवलेली नाळ यामूळे मी प्रभावित झालो आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना दैवत मानून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
स्व. मुंडे साहेबांच्या नेतृत्वात काम करीत असताना त्यांनी मला कार्यकर्त्याचा नेता केले. मुंडे साहेबांची राजकीय जीवनाची सुरुवात झालेल्या रेणापूर विधानसभा मतदार संघातील रेणापूर तालुका मतदार संघाच्या पुर्नरचनेत समाविष्ट झालेल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर दिली हे खूप मोठे भाग्य आहे. २००९ साली मला उमेदवारी मिळेल याची खात्री नव्हती मात्र मुंडे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला महालक्ष्मीच्या सणा दिवशी मुंबईत बोलावून रमेश तुला निवडूणक लढवायची आहे, कामाला लागा, तयारी सुरु करा अशी सुचना दिली. त्यानूसार मी प्रस्थापित शक्ति विरुद्ध निवडणूक लढवली आणि पराभूत झालो. पराभव झाल्यानंतर पहिला फोन मुंडे साहेबांचाच आला, खचून जाऊ नको अपयशही यशाची पहिली पायरी आहे. असे सांगितल्याने मला खूप मोठा दिलासा मिळाला आणि परत पुन्हा नव्या जोमाने, जिद्दीने साहेबांच्या नेतृत्वात काम करत राहिलो.
सन २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत साहेब नव्हते मात्र काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणूकीत मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातल्या शंभरहून अधिक विधानसभा उमेदवारांची यादी तयार करून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे दिली होती. त्या यादीत माझे नाव नवव्या क्रमांकावर होते, ही यादी आजही देवेंद्रभाऊ कडे आहे. मुंडे साहेबांनी एकदा शब्द दिला की, ते पाळतातच हे मला वेळोवेळी अनुभवायला मिळाले.
मुंडे साहेबांची काम करण्याची पद्धत ऐवढी जबरदस्त होती ती कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. दिवस-रात्र, ऊन-पाऊस, वेळ-काळ त्यांनी कधीच पाहिला नाही. मागील काळात गारपीठ होऊन नूकसानीत आलेल्या शेतकर्यांाची पीके पाहण्यासाठी मुंडे साहेबांनी सकाळी ९ वाजता दौरा सुरु केला आणि तो पहाटे ४.३० वाजता संपला या दरम्यान रेणापूर, लातूर, चाकूर, अहमदपूर, लोहा, कंधार या तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्यांंच्या पीकांची त्यांनी पाहनी केली रात्रीच्या वेळेला तर बॅटरीच्या प्रकाशात पाहणी करणारा एकमेव नेता मला जानवला. दौरा संपल्यानंतर रात्रीचे जेवण पहाटे ४.३० वाजता मुंडे साहेबांनी केले. त्यांचे कष्ट, मेहनत जवळून पाहता आली.
जनतेच्या प्रश्नांवर काम कसे करावे. आंदोलने, मोर्चे यशस्वी कसे होतील याची शिकवण त्यांनी मला दिली. त्यांच्यामूळेच लातूर ग्रामीण मध्ये प्रस्थापित शक्ति विरुद्ध संघर्ष करून पक्ष वाढविण्याचे काम करण्यात मला यश आले. मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर तहसिलवर शेतकर्यां च्या प्रश्नांवर काढलेला हजारो बैलगाडी मोर्च्याची संपूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली.
खरच मुंडे साहेबांना पुढे जाण्याची घाई असायची माझी कोणीतरी वाट पाहत आहे मला गेलं पाहिजे असे सांगून साहेब जेवण टाळायचे. बर्यामच वेळी मुंडे साहेबांसोबत चालत्या गाडीतच हातावर चपाती-भाकरी घेवून जेवण करण्याचा मलाही योग आला. जनावराच्या चारा छावनीत मुक्काम करणारे, चांदा ते बांधा महाराष्ट्रभर प्रवास करून मेळावे, मोर्चे, आंदोलने करून शेतकरी शेतमजूर गोरगरीब दिनदलीतांच्या प्रश्नांवर संघर्ष करणारे मुंडे साहेब यांनी स्वत:च्या कुटूंबाला कधीच वेळ दिला नाही ते मी माझ्या डोळ्याने पाहिले अनुभवले. जे करायचे ते समाजासाठी, जनतेसाठी ही भूमिका त्यांची त्यांच्या कामातून दिसून येत होती.
विधान परिषदेच्या सभागृहात काम करण्याची मिळालेली संधी ही स्व. मुंडे साहेबांच्या कृपा आशिर्वादानेच मिळाली असून येत्या काळात वाडी-तांड्यातील, ग्रामीण भागातील वंचितांना, पीडितांना, कष्टकर्यांेना न्याय मिळाला पाहिजे यासाठी स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी पाहिलेल्या स्वप्नांसाठी, गोरगरीब सर्व सामान्यांच्या हितासाठी आणि न्याय हक्कासाठी काम करणार आहे.
रमेश तू आमदार होणार असे पाठिवर थाप मारून मला सतत बोलायचे. काम करत रहा केलेले काम वाया जाणार नाही, हे त्यांचे शब्द आज खरे ठरले, मुंडे साहेब आपल्यात नाहीत याचे अंतकरणातून दु:ख होत आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी ज्या दिवशी विधान भवनात शपथ घेतली त्या दिवशी त्यांची आवर्जून आठवण आली त्यांनी गाजवलेल्या सभागृहात जाताच आपोआप माझे डोळे पाणावले खरच आज साहेब असायला हवे होते. स्व.मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन. !!!
आ. रमेश काशीराम कराड
सदस्य, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य.

Adv