शाहूपुरी परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या कारवाईला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी तसेच अपघाताचा धोका वाढत असताना, कारवाई मात्र काही ठिकाणी संथ का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा–सांगली विधान परिषद निवडणुकीच्या काळात भाजपमधील नेत्यांना विश्वासात न घेता काही राजकीय हालचाली करणाऱ्या शाहूपुरीतील ‘त्या साहेबां’बाबत आता नव्या चर्चा रंगल्या आहेत. अतिक्रमणधारकांकडून ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्यामुळेच कारवाईला ब्रेक लागला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लिंबच्या उसाच्या फडातून शाहूपुरीच्या अतिक्रमणापर्यंत सूत्रे हलतात का? नियोजन विभागातील काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘अतिक्रमण काढू नका’ असा अप्रत्यक्ष संदेश दिला जात असल्याचा आरोपही चर्चेत आहे. या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याचा खुलासा संबंधितांनी करणे गरजेचे आहे.
अतिक्रमण हटविल्यास रस्ता रुंद होईल, वाहतूक सुरळीत होईल आणि अपघाताचा धोका कमी होईल. मग नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा अतिक्रमणधारकांचे हित महत्त्वाचे आहे का?






