नगरपालिका अधिनियमाच्या चिंध्या करण्याचे काम सध्या आरोग्य विभागात सुरू आहे . आस्थापनेवर बिगारी म्हणून नेमणूक असलेला कर्मचारी सध्या आरोग्य विभागाचा म्होरक्या म्हणून मिरवत असून तांत्रिक अर्हता धारण केलेला आरोग्य निरिक्षकाला मात्र केवळ सही पुरतेच ठेवण्यात आले आहे .
आरोग्य विभागाची ही राजकीय व्यवस्था कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे याचा शोध घेतल्यावर काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत . मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी अद्याप कोणतीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .
आस्थापनेवर बिगारी म्हणून नोंद असलेले शैलेश अष्टेकर आरोग्य निरिक्षकांच्या अटक नाटयानंतर आरोग्य विभागात रूजू झाले त्यावेळी सुहास पवार यांना आरोग्य विभागाची सूत्रे देण्यात आली होती . मात्र तीन महिन्यापूर्वी त्यांची अन्यत्र बदली करून अष्टेकर यांना या विभागाची जवाबदारी देण्यात आली . दरम्यान याच विभागात राज्य संवर्गातील आरोग्य निरिक्षक पदाची पात्रता असणारे प्रकाश राठोड येथे हजर झाले मात्र त्यांना पदभार देण्यात न आल्याने त्यांना चक्क अष्टेकर यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे . राठोड यांच्या तक्रारीनंतरही पदभार देण्याचे कोरडे आश्वासन त्यांना देण्यात आले . अद्यापही राठोड यांना केवळ सही पुरतेच विभागात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे . पदरचनेची मोडतोड करण्याचा सावळा गोंधळ नवीन नाही . काही वर्षापूर्वी लेखा विभागात फलटण वरून बदलून आलेल्या एकनाथ गवारी यांना पदभार देण्याऐवजी सोयीस्कर कारणांसाठी विवेक जाधव यांना पदभार देण्यात आला होता . या पदरचनेच्या मोडतोडीत बरेच राजकारण लपल्याची चर्चा आहे .
२१ टक्क्यांची बिदागी ?
या पदरचनेच्या मोडतोडीत मिळणाऱ्या घसघशीत बिदाग्या हे मूळ वादाचे कारण आहे . सफाई ठेकेदार आणि मुकादम यांच्याकडून बोगस हजेरी पत्रकाद्वारे सर्व सफाई कामगार हजर दाखविले जाऊन त्यांचे वेतन काढले जाते . साताऱ्यात तीन ठेकेदार सक्रीय असून किमान कंत्राटी सव्वाशे कामगारांचे वेतन चार लाखापर्यंत जाते त्यामध्ये सध्याचे विद्यमान कारभारी एकवीस टक्क्याचा मलिदा ओरपत असल्याची चर्चा आहे .मध्यंतरी नव्याने रूजू झालेल्या आरोग्य निरीक्षकाने दैनंदिन हजेरी पत्रकाची शिफारस केल्याने एका मुकादमाने त्यांना दमबाजी केल्याचा प्रकार घडला होता .