
“लोकशाही सुदृढ करण्यासाठी आणि प्रशासन अधिक जबाबदार बनवण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा (आरटीआय) एक प्रभावी साधन ठरला आहे. नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव होऊ लागल्याने माहिती लपवण्याच्या प्रकारांना आळा बसला आहे. प्रशासन अधिक जबाबदारीने काम करू लागले आहे. या कायद्यामुळे सरकारी कामकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता वाढली आहे, ” असे प्रतिपादन यशदा पुणे चे प्रविण प्रशिक्षक ओमकार पाटील यांनी केले.
सामाजिक क्षेत्रात गेली १५ वर्षे सामाजिक कार्याबरोबर माहिती अधिकार कायद्यांतर्गत विविध प्रकरणे उघडकीस आणणारे ‘दिशा विकास मंच’ आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य सदन , जिल्हा पत्रकार भवन गोडोली येथे शनिवार दि.८ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सातारा शहरातील विविध शासकीय कार्यालयातील जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी असलेल्या महिला अधिकाऱ्यांसाठी माहिती अधिकार अधिनियम याबद्दल “नको भिती, हवी माहिती” या टॅग लाईनवर आधारित, “माहिती अधिकार अधिनियम प्रबोधन कार्यशाळा सातारा पत्रकार भवन येथे आयोजित केली होती.
सातारचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यशदाचे प्रविण प्रशिक्षक ओमकार पाटील यांनी, माहिती अधिकार अधिनियमामुळे प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणि खुलेपणा निर्माण झाला आहे. गतीमान प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक कार्यालयातील जनमाहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी यांना अधिनियम महत्वाची कलमे, तरतुदीबाबत परिपूर्ण ज्ञान हवे, असे सांगून कायदेशीर माहिती, तरतुदी याबाबत प्रभावीपणे मार्गदर्शन केले. सहभागी महिला अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या अनेक शंकांचे निरसन यावेळी ओमकार पाटील यांनी केले.
प्रास्ताविक करताना ‘दिशा विकास मंच’चे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी गेली १५ वर्षे केलेल्या कामाची माहिती दिली.
आभार डॉक्टर स्मिता लोंढे मॅडम यांनी मानले.
*चौकट*
*सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना ‘दिशा विकास मंच’कडून पुरस्कार*
‘दिशा विकास मंच’च्यावतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकीतून कार्य करणाऱ्या संस्थांना समाज रत्न पुरस्कार दिले जातात. यावेळी आरंभ बहुउद्देशीय संस्था सातारा, संवाद सोशल रिसर्च आणि डेव्हलपमेंट फाउंडेशन, सातारा आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था बार्शी सोलापूर या संस्थांना मनोज शेंडे, ओमकार पाटील, विजय जाधव, सुशांत मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले