Saturday, June 27, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसुली तात्काळ बंद करा

रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसुली तात्काळ बंद करा

107
Adv

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजनेअंतर्गत पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांवरील उपचार पॅनलवरील रुग्णालयांमध्ये विनामूल्य ओषधोपचार उपलब्ध करून देण्याची गृह विभागाचे जुलै 2006 चे शासन निर्णयात स्पष्ट तरतूद आहे. तथापि, प्रत्यक्षात काही पॅनलवरील रुग्णालयांकडून विविध कारणे सांगून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकडून आंतररुग्ण म्हणून उपचार घेताना अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
कर्तव्य बजावताना स्वतःचे आरोग्य व जीव धोक्यात घालणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मंजूर केलेल्या योजनेचा पूर्ण लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र काही रुग्णालयांकडून नियमबाह्य शुल्क आकारणी केल्यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासणारी आहे.
त्यामुळे महाराष्ट्र शासन, पोलीस महासंचालक कार्यालय तसेच संबंधित आरोग्य विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पॅनलवरील सर्व रुग्णालयांकडून योजनेच्या नियमांचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करावी. अतिरिक्त शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पोलीस कर्मचारी व पोलीस कुटुंबीयांसाठी प्रभावी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी पोलीस बॉईज व पोलीस परिवाराचे वतीने पोलीस उपाधीक्षक गृह श्री. देवकर साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने दिलेला आरोग्याचा हक्क कोणत्याही परिस्थितीत अबाधित राहिला पाहिजे. यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पोलीस बॉईज चे किरण खरात यांनी व्यक्त केली आहे.

Adv