सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा तिढा आणि सातारा जिल्हा परिषदेतील सत्तावाटपाचा प्रश्न आता थेट राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. जिल्हा बँकेवर भाजपला आपला अध्यक्ष बसवायचा असेल, तर जिल्हा परिषदेत अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी भेट घेऊन साताऱ्यातील सत्तावाटपाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी दोन वर्षे भाजपकडे आणि त्यानंतर एक वर्ष अन्य मित्रपक्षाकडे अध्यक्षपद, असा फॉर्म्युलाही चर्चेत असल्याचे समजते. मात्र, भाजपला जिल्हा बँकेत सत्ता देताना जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्तेत योग्य वाटा द्यावा लागणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत सदस्यसंख्या आणि राजकीय ताकद असूनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या निमित्ताने जिल्हा परिषदेतील सत्तेचे समीकरण बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीने शिंदे आणि पवार यांच्याशी होणाऱ्या चर्चेत नेमका कोणता फॉर्म्युला निश्चित होतो, यावर साताऱ्यातील सहकार आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. जिल्हा बँकेची खुर्ची मिळवण्यासाठी भाजपला जिल्हा परिषदेतील सत्तेचा त्याग करावा लागणार की महायुती नवा सत्तासमीकरणाचा मार्ग काढणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.






