सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची आणि हिंदवी स्वराज्याच्या शौर्यगाथेची आठवण करून देणारे भव्य गड-किल्ल्यांचे प्रदर्शन सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक येथे साकारण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनात तब्बल ४५ गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असून, हे प्रदर्शन सध्या नागरिक आणि शिवप्रेमींचे आकर्षण ठरत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अंबवडे बुद्रुक येथे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाही गावाने किल्ल्यांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास जिवंत केला आहे. गड-किल्ल्यांची रचना, स्थापत्यशैली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचा इतिहास अनुभवण्यासाठी सातारा जिल्ह्यासह विविध भागांतून नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
केवळ मनोरंजन नव्हे, तर नव्या पिढीला शिवरायांचा इतिहास, गडकोटांचे महत्त्व आणि स्वराज्याचा अभिमान समजावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. वाढता प्रतिसाद लक्षात घेता १७ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
किल्ल्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या अंबवडे बुद्रुकने ४५ गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींतून शिवशाहीचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत केला आहे. त्यामुळे हे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमींनी आवर्जून भेट द्यावी.






