सातारा | पालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये पालिकेच्या विद्युत व्यवस्थेचा अजब कारभार समोर आला आहे. येथील रस्त्यावरील तीन विद्युत खांबांवरील दिवे सुरू असले, तरी त्यांचा प्रकाश झाडाझुडपांमध्येच अडकून पडत आहे. परिणामी, मुख्य रस्त्यावर पुरेसा उजेड पडत नसल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
दिवे सुरू असूनही रस्त्यावर प्रकाश नाही, अशी परिस्थिती असताना संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेच्या इतक्या जवळ हा प्रकार घडत असेल, तर शहरातील इतर भागांची अवस्था काय असेल, अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.
झाडाझुडपांची छाटणी करून रस्त्यावर पुरेसा प्रकाश पडेल, अशी व्यवस्था करण्याची गरज आहे. आता प्रभाग क्रमांक १५ मधील नगरसेवक या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना अंधारातून दिलासा देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.






