सातारा : राज्यातील बहुतांश भागांत दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जलमंदिर पॅलेस येथे साजरा होणारा ऐतिहासिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना सोहळ्यातील अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारच्या ऐतिहासिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या या शाही सीमोल्लंघन सोहळ्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. हा सोहळा केवळ राजघराण्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण सातारकरांच्या भावनेशी जोडलेला आहे. श्री भवानी तलवारीचे आणि आई तुळजाभवानीचे विधिवत पूजन, भवानी तलवारीची शाही पालखी मिरवणूक, पोवई नाका येथील ऐतिहासिक वेशीवर पूजन आणि जलमंदिर पॅलेस येथे परतल्यानंतर औक्षण व पूजन, असा या सोहळ्याचा पारंपरिक क्रम असतो.
गेल्या काही वर्षांपासून शासनही या सोहळ्यात सहभागी होत असून, पोलीस बँड पथकाकडून शासकीय सलामी दिली जाते. मात्र, यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सोहळ्याचा डामडौल कमी करून धार्मिक विधी आणि परंपरा कायम ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे.
दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन
परतीच्या पावसानेही निराशा केल्याने राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे असून जनावरांना जगवणेही कठीण बनत आहे. अशा परिस्थितीत शाही सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करणे योग्य वाटत नसल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
त्यामुळे सीमोल्लंघन सोहळा प्रथा आणि परंपरेनुसार होणार असला, तरी तो अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांनी अनावश्यक खर्च, बॅनरबाजी आणि इतर दिखाऊ उपक्रम टाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कार्यकर्ते आणि नागरिकांनीही वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील अनावश्यक खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांना शक्य ती मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
परंपरेचा मान कायम; दुष्काळग्रस्तांच्या वेदनांना प्राधान्य, असा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.






