सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली असून, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार धैर्यशील कदम हे दोन्ही नेते १ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर आमदार धैर्यशील कदम हे बँक पतसंस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या उमेदवारीमुळे संबंधित मतदारसंघांमध्ये निवडणुकीची चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांच्या बैठका आणि उमेदवारीबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. १ ऑक्टोबर रोजी गोरे आणि कदम यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






