Wednesday, September 23, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District गणेश विसर्जन तलावाची सुरक्षा रामभरोसे!

गणेश विसर्जन तलावाची सुरक्षा रामभरोसे!

103
Adv

सातारा : गणेश विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावाची सुरक्षा व्यवस्था सध्या प्रश्नचिन्हाखाली आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून तलाव परिसरातील लाईट दिवस-रात्र सुरू असल्याचे दिसून येत असतानाच, तलावाभोवती पुरेसे बॅरिकेडिंग आहे का, नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत का, तसेच रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरावर प्रभावी देखरेख आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

विसर्जन तलावाच्या ठिकाणी घसरून पडण्याचा धोका, तलावाच्या काठावर सुरक्षित अंतर राखण्यासाठी आवश्यक अडथळे, गर्दी नियंत्रणाची व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्याची यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची सतत उपस्थिती या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र या व्यवस्थेबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
टेंडरच्या वेळी पुढाकार घेणारे आता प्रत्यक्ष व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पुढे का येत नाहीत? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आली की हे स्वयंघोषित नेते गायब का होतात? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. केवळ टेंडर आणि कामाच्या वेळी श्रेय घेण्यापेक्षा विसर्जन तलावाची सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची गरज आहे.

तळ्याच्या हट्टापायी राजकीय विसर्जन झालेला नेता आता कुठे गायब?
गणेश विसर्जन तलावाच्या मुद्द्यावर हट्टाची भूमिका घेऊन चर्चेत आलेल्या आणि त्याच मुद्द्यामुळे राजकीय विसर्जन झाल्याची चर्चा असलेल्या त्या नेत्याचा आता तलावाच्या सुरक्षेतील त्रुटींवर आवाज कुठे गायब झाला? असा सवाल पालिका वर्तुळातून उपस्थित होत आहे. टेंडरच्या वेळी पुढाकार घेणारे हेच नेते आता तलाव परिसरातील सुरक्षा व्यवस्था, बॅरिकेडिंग, गर्दी नियंत्रण आणि दिवस-रात्र सुरू असलेल्या दिव्यांबाबत मौन का बाळगत आहेत, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. हट्टासाठी पुढे येणारे नेते सुरक्षेच्या प्रश्नावर मैदानात कधी उतरणार? असा सवालही आता उपस्थित होत आहे.

पाच दिवसांपासून दिवस-रात्र लाईट सुरू ठेवण्यामागे नेमके कारण काय? विजेचा अपव्यय होत असताना सुरक्षा व्यवस्थेकडे मात्र पुरेसे लक्ष दिले जात आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. पालिका प्रशासनाने केवळ दिवे सुरू ठेवण्यापेक्षा बॅरिकेडिंग, सुरक्षा कर्मचारी, सीसीटीव्ही/देखरेख, आपत्कालीन मदत व गर्दी नियंत्रणाची प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Adv