शहरातील भाजी मंडई परिसरात सुरू असलेल्या रंगकामाच्या कामावरून उपस्थित झालेल्या प्रश्नांना अखेर काही प्रमाणात उत्तर मिळाले आहे. ‘ठेकेदाराने दिले स्वतःच्या कामाला प्राधान्य; शेजारीच असलेल्या मान्यवरांच्या प्रतिमांच्या भिंतीला साधा कलरही नाही’ या मुद्द्यावर सातारानामाने आवाज उठवल्यानंतर संबंधित भिंतीला रंग देण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
भाजी मंडई परिसरात रंगकाम सुरू असताना शेजारीच असलेल्या भिंतीवरील शहराची मान उंचावणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिमांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे चित्र समोर आले होते. त्यामुळे पालिकेच्या कामात नियोजनाचा अभाव आहे की ठेकेदाराच्या सोयीला प्राधान्य दिले जात आहे? असा सवाल उपस्थित झाला होता.
या प्रकाराची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून संबंधित भिंतीकडे लक्ष देण्यात आले असून कलर करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सातारानामाच्या पाठपुराव्याला पुन्हा एकदा यश मिळाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
शहराच्या इतिहासाशी आणि अस्मितेशी संबंधित मान्यवरांच्या प्रतिमा असलेल्या भिंती स्वच्छ, सुस्थितीत आणि आकर्षक ठेवणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ ठेकेदाराच्या ठेक्यातील काम पूर्ण करण्यापेक्षा संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण आणि सार्वजनिक मालमत्तेचे जतन याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
या प्रकरणात सातारानामाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर कामाला सुरुवात झाली असली, तरी यापुढे अशा कामांमध्ये तक्रार किंवा बातमी होण्याची वाट न पाहता पालिकेने स्वतःहून नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, अशी अपेक्षा सातारकरांकडून व्यक्त होत आहे.
सातारानामा सवाल विचारत राहणार आणि शहरहिताच्या प्रश्नांसाठी पाठपुरावाही करत राहणार!






