सातारा : कला, भक्ती आणि सातारच्या परंपरेचा संगम घडवून आणणाऱ्या श्री नर्मदेश्वर गणेशोत्सव मंडळ, शुक्रवार पेठ, सातारा यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘भव्य रील्स स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. गणेश आगमन सोहळ्यातील विविध क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपून त्याची आकर्षक रील तयार करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून सातारकरांना मिळणार आहे.
मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता राजवाडा बसस्थानक, सातारा येथून नर्मदेश्वर गणेशोत्सव मंडळाचा भव्य गणेश आगमन सोहळा पार पडणार आहे. या आगमन सोहळ्याचे चित्रीकरण करून त्यातून उत्कृष्ट रील सादर करणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये, तृतीय क्रमांकास २ हजार रुपये, तर चतुर्थ क्रमांकास १ हजार ५०० रुपये रोख बक्षीस व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
‘तुमची रील, तुमची कला… जिंकण्याची संधी तुमची!’
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रील ही नर्मदेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या २०२६ च्या आगमन सोहळ्याशी संबंधित असणे आवश्यक आहे. रीलमध्ये मंडळाची प्रतिमा अथवा मंडळाच्या गणेश आगमन सोहळ्याचे चित्रीकरण असणे बंधनकारक आहे. रीलचा कालावधी ३० ते ९० सेकंदांदरम्यान असावा.
स्पर्धकाने स्वतः शूट केलेली आणि एडिट केलेली रीलच ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच अश्लील, अपमानास्पद अथवा मंडळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारा कोणताही मजकूर, व्हिडिओ किंवा आशय स्वीकारला जाणार नाही.
रील पोस्ट करताना मंडळाच्या अधिकृत Instagram अकाउंटला Tag करणे अनिवार्य असून @narmadeshwar_1967 या अकाउंटचा वापर करावा लागणार आहे. अधिकृत हॅशटॅगचाही वापर करणे आवश्यक आहे.
क्रिएटिव्हिटीला मिळणार प्राधान्य
रील्सच्या परीक्षणामध्ये Creativity, Editing, Camera Work, Storytelling, Audio Sync आणि Engagement या बाबींचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे केवळ आगमन सोहळ्याचे चित्रीकरण करण्यापेक्षा त्याला आकर्षक कल्पकतेची जोड देणाऱ्या रील्सना स्पर्धेत अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून स्पर्धेच्या नियम व अटींचे पालन करणाऱ्या रील्सच परीक्षणासाठी ग्राह्य धरल्या जातील.
‘आमचा वेगळेपणा, आमची परंपरा’ ही संकल्पना जपत नर्मदेश्वर गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक उत्सवासोबत आधुनिक सोशल मीडिया माध्यमाचा प्रभावी वापर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘भक्ती, संस्कार, एकता आणि आपली परंपरा’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रील्स स्पर्धेमुळे युवा वर्गाला आपल्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणार आहे.
सातारच्या गणेश आगमनाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचे आवाहन
गणेश आगमन सोहळ्यातील उत्साह, पारंपरिक वातावरण, सजावट, भक्तिभाव आणि सातारच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन आपल्या रीलमधून घडवावे आणि जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन नर्मदेश्वर गणेशोत्सव मंडळ, शुक्रवार पेठ, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी संपर्क :
अनिकेत शिंदे – 7770040009
रोहन गोसावी – 9511700554
प्रथमेश वेदपाठक – 7887828007






