सातारा, दि. ३ : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानात उतरून नियोजन सुरू केले आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुरुवारी शहरातील गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांची पाहणी करून संभाव्य अडचणींचा आढावा घेतला.
एसपी पिंगळे यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी सचिन म्हेत्रे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांचा ताफा पाहणीसाठी उपस्थित होता. राधिका रोड, कर्मवीर पथ, मोती चौक, राधिका चौक, बारटक्के कॉर्नर तसेच विसर्जन तलावाकडे जाणाऱ्या मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
मिरवणुकीच्या काळात अरुंद रस्ते, वाढणारी गर्दी, वाहनांची संख्या आणि नागरिकांची होणारी वर्दळ यामुळे वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी वाहतूक वळवावी, पर्यायी मार्ग कोणते असावेत, तसेच मिरवणुकीच्या मार्गावर कोणत्या ठिकाणी अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करावी, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
एसपी पिंगळे यांनी सुमारे दीड तास शहरातील विविध भागात फिरून परिस्थिती जाणून घेतली. मिरवणूक मार्गातील अडथळे, गर्दीची संभाव्य ठिकाणे आणि वाहतूक कोंडीची शक्यता असलेल्या भागांची नोंद घेण्यात आली. गणेशोत्सवातील शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे.
नागरिकांना मिरवणुकीदरम्यान सुरक्षित वातावरण मिळावे आणि वाहतुकीचा खोळंबा टाळता यावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून मार्गनिहाय नियोजनावर भर दिला जात आहे.






