पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन-२०२६ निमित्त रविवारी (दि. ६) सातारा शहरातील वाहतुकीचे नियोजन बदलण्यात आले आहे. मॅरेथॉन सुरळीत पार पडावी आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीत काही प्रमुख रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पोलीस परेड ग्राउंड येथून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. पोवई नाका, मरिआई कॉम्प्लेक्स, शाहू चौक, अदालत वाडा, समर्थ मंदिर बोगदा, यवतेश्वरमार्गे प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या पुढील भागापर्यंत स्पर्धेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या मार्गावरून परतीची वाहतूकही मॅरेथॉनच्या मार्गानेच होणार असल्याने या कालावधीत सर्वसाधारण वाहनांना प्रवेश मिळणार नाही. मात्र रुग्णवाहिका, पोलीस व अग्निशमन दलाच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.
गोडोली, अजंठा चौक आणि शिवराज पेट्रोल पंपाकडून येणाऱ्या वाहनांनी ग्रेड सेपरेटरमार्गे डी. बी. कदम मार्केट व राधिका सिग्नलचा वापर करावा. बॉम्बे रेस्टॉरंट चौकाकडून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी जिल्हा परिषद चौक, कनिष्क हॉल, रिमांड होम, जुना आरटीओ चौक आणि भुविकास चौक हा पर्यायी मार्ग राहणार आहे.
सज्जनगड, ठोसेघर व परळी परिसरातील वाहनांना शेंद्रे, खिंडवाडी रोड, शिवराज पेट्रोल पंप, अजंठा चौक व गोडोलीमार्गे शहरात येता येईल. कासकडून येणाऱ्या वाहनांना मात्र मॅरेथॉन पूर्ण होईपर्यंत प्रकृती हेल्थ रिसॉर्टकडील मार्ग बंद राहणार असून एकीव फाटा, मोळेश्वर, कुसुंबीमुरा, कुसुंबी व मेढामार्गे साताऱ्यात यावे लागणार आहे.
दरम्यान, मॅरेथॉनसाठी येणाऱ्या स्पर्धक व नागरिकांसाठी प्रशासकीय इमारत व संग्रहालय परिसर, जुनी भुविकास बँक बेसमेंट, लँडमार्क टॉवर परिसर तसेच स्टेडियम परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






