सातारा : गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना सातारा शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामावरून पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे रस्त्यांच्या डागडुजीसाठी डांबराचा वापर अपेक्षित असताना काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये चक्क विटांचा चुरा भरला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ‘डांबर नगरपालिकेत अन् खड्ड्यात विटांचा चुरा’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचे मार्ग खड्डेमुक्त करण्याची जबाबदारी सातारा पालिकेची असताना ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच अशा पद्धतीने रस्त्यांची डागडुजी केली जात असल्याने सातारकरांमध्ये नाराजी आहे. खड्ड्यांमध्ये योग्य पद्धतीने डांबर टाकून रस्ते दुरुस्त करण्याऐवजी विटांचा चुरा टाकून काम उरकण्याचा प्रयत्न होत असेल, तर या कामाची गुणवत्ता कोण तपासणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
गणेश आगमनाच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, गणेशमूर्तींची वाहने आणि हजारो भाविकांचा सहभाग असतो. अशा परिस्थितीत रस्त्यांवरील खड्डे तसेच राहिल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व प्रमुख मार्गांची पाहणी करून दर्जेदार पद्धतीने डागडुजी करणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे भाजपच्या सत्ताकाळातच गणेशोत्सव आगमन सोहळ्याच्या अगोदर पालिकेच्या कामकाजाची ही अवस्था का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ वरवरची मलमपट्टी करून गणेशोत्सवाची तयारी झाल्याचे दाखवण्यापेक्षा रस्त्यांची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
खड्डे बुजवले जात आहेत की केवळ फोटोसेशनपुरती कामे केली जात आहेत? खड्ड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता, कामाचा ठेका, खर्च आणि कामाची तपासणी याची माहिती पालिकेने सार्वजनिक करावी, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
गणेश आगमनाच्या मार्गावरच जर अशा पद्धतीने काम होत असेल, तर गणेशोत्सवाच्या दिवशी सातारकरांना त्याचा फटका बसणार नाही का? ‘खड्ड्यात डांबर की विटांचा भर?’ याचे उत्तर पालिका प्रशासनाने द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी रस्ते दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर येतो. मात्र उत्सव संपल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते दुरुस्ती करण्याची गरज आहे. अन्यथा पालिकेच्या या अजब कारभाराविरोधात नागरिकांचा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.






