मसाल्याच्या व्यवसायासाठी घेतलेल्या पैशांवरून वाढीव व्याजाची मागणी करीत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
योगेश अशोक सुतार (रा. शाहूपुरी, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुतार यांनी १९ जानेवारी २०२४ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत व्यवसायासाठी सुरेश सावंत (शाहूपुरी), अक्षय दळवी व रोहित दळवी (दोघे रा. परळी, ता. सातारा), अमित शिंदे (रा. झरेवाडी, ता. कोरेगाव), दत्तात्रय जगताप (रा. भोंदवडे, ता. सातारा) आणि सागर गोळे (रा. जकातवाडी, ता. सातारा) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.
दरम्यान, घेतलेल्या रकमेच्या परतफेडीवरून संबंधितांकडून सुतार यांच्याकडे अधिक व्याजाची मागणी करण्यात आली. मुद्दल रक्कम अद्याप बाकी असल्याचे सांगत फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटीत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.






