सातारा नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आणि शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा सातारकरांनी व्यक्त केली होती. मात्र, सत्तेची सूत्रे हाती येऊनही पालिकेतील अंतर्गत वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. उलट नगरसेवकांमधील मतभेदांपासून ते ठेकेदारांमधील संघर्षापर्यंतच्या घडामोडी आता खुलेआम चर्चेत येऊ लागल्याने पालिकेचा कारभारच चव्हाट्यावर आला आहे.
कधी नगरसेवकांमध्ये वाद, कधी ठेकेदारांमध्ये वाद आणि त्यातून निर्माण होणारे आरोप-प्रत्यारोप… यामुळे सातारकरांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, पालिकेत सत्ता एकहाती असताना हा वाद नेमका कोणाच्या इशाऱ्यावर आणि कोणासाठी?
पालिकेवर भाजपची पूर्ण पकड असतानाही जर अंतर्गत संघर्षाला लगाम लागत नसेल, तर पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाची जबाबदारी नेमकी कोणाची? सत्तेचा उपयोग शहराच्या विकासासाठी होणार की सत्तेतील संघर्ष सोडवण्यासाठी? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.
पालिकेतील वाद चार भिंतींच्या आत राहण्याऐवजी सार्वजनिक चर्चेचा विषय बनत असतील, तर ही बाब केवळ सत्ताधाऱ्यांसाठी नव्हे तर संपूर्ण भाजपसाठी चिंतेची ठरू शकते. कारण शहराला रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक आणि मूलभूत सुविधांची गरज असताना राजकीय कुरघोड्या आणि अंतर्गत संघर्षाला प्राधान्य मिळत असल्याची भावना निर्माण होत आहे.
“भाजपची सत्ता आली, पण वादांची परंपरा मात्र कायम राहिली,” अशी बोचरी चर्चा आता सातारकरांमध्ये सुरू आहे.
सातारा पालिकेतील या घडामोडींवर राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष घालणार का? स्थानिक नेतृत्वाला जाब विचारणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालिकेतील वादांना पूर्णविराम देऊन विकासकामांना प्राधान्य देणार का?
या प्रश्नांची उत्तरे आता सातारकरांना हवी आहेत. सत्ता एकहाती असेल तर कारभारही तितकाच शिस्तबद्ध आणि जबाबदार असायला हवा; अन्यथा “सत्ता भाजपची, पण सातारा पालिका चव्हाट्यावर” ही चर्चा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सातारा पालिकेतील या घडामोडींवर राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष घालणार का? स्थानिक नेतृत्वाला जाब विचारणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालिकेतील वादांना पूर्णविराम देऊन विकासकामांना प्राधान्य देणार का?






