Saturday, August 8, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City नियोजन सभापती कोणाच्या दबावाखाली घेत आहेत विषय?

नियोजन सभापती कोणाच्या दबावाखाली घेत आहेत विषय?

18
Adv

सातारा : प्रतिनिधी

सातारा पालिकेच्या नियोजन विभागाच्या बैठकीत नेमके चाललेय तरी काय? नियोजन विभागाच्या बैठकीत सातपैकी तब्बल चार विषय नामंजूर झाल्याने सभापती अशोक शेडगे यांच्या कारभारावर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच नियोजन विभागाच्या बैठकीत बांधकाम विभागाशी संबंधित विषय सादर करण्यात आल्याने विषय मांडणीपासून निर्णय प्रक्रियेपर्यंत संपूर्ण कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

नियोजन विभागाच्या बैठकीत नियोजनाशी संबंधित विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असताना बांधकाम विभागाचे विषय नेमके कोणत्या आधारावर आणले गेले? विषय सादर करण्यापूर्वी त्याची छाननी झाली होती का? की कोणाच्या दबावामुळे विषय थेट बैठकीच्या अजेंड्यावर आणले जात आहेत? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे सात विषयांपैकी चार विषय नामंजूर होणे ही बाबदेखील चर्चेचा विषय ठरली आहे. जर विषय योग्य पद्धतीने तपासून आणि नियमांनुसार बैठकीसमोर आणले जात असतील, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात विषय नामंजूर होण्यामागचे कारण काय? नियोजन विभागात नेमके नियोजनाचा अभाव आहे की निर्णयांवर बाहेरील हस्तक्षेपाचा प्रभाव आहे?

पालिकेतील या प्रकारामुळे सभापती अशोक शेडगे यांच्या कारभारावर संशयाची सुई रोखली जात असून, बैठकीत विषय कोणाच्या सूचनेवरून घेतले जातात, त्यांची छाननी कोण करतो आणि अंतिम निर्णय कोणाच्या दबावाखाली होतात, याचा खुलासा होणे गरजेचे आहे.

नियोजन विभागाची बैठक आहे की बांधकाम विभागाची? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. नियम, प्रक्रिया आणि विभागनिहाय जबाबदारी यांना बगल देऊन विषय मांडले जात असतील तर त्याची जबाबदारी निश्चित कोणाची?

पालिकेच्या कामकाजात पारदर्शकता अपेक्षित असताना सातपैकी चार विषय नामंजूर आणि त्यात चुकीच्या विभागाचे विषय सादर होण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे आता सभापती अशोक शेडगे यांनीच स्पष्ट करावे—नियोजन विभागाचा अजेंडा कोण ठरवते आणि नेमका कोणाचा दबाव आहे?

सातारकरांच्या पैशातून चालणाऱ्या पालिकेच्या कारभारात ‘नियोजन’ हवे की ‘दबावाचे नियोजन’? याचे उत्तर आता जनतेला अपेक्षित आहे.

Adv