सातारा शहरातील सर्वोदय कॉलनी, गडकरआळी येथील बागेचे काम अवघ्या वर्षभरापूर्वी पूर्ण झाले. मात्र इतक्या कमी कालावधीतच बागेची संरक्षक भिंत कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांमध्ये या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याची चर्चा सुरू असून, संबंधित बांधकामाच्या ठेक्यात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप झाल्याचा आरोपही केला जात आहे. तसेच बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनीही या कामाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून नुकसानभरपाईसह दुरुस्तीचे काम तातडीने करून घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
भाजपच्या सत्ताकाळात पालिकेतील विकासकामांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पालिकेच्या कारभाराकडे लक्ष देऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, बागेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या कामाच्या निविदा प्रक्रियेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
मोरे यांनी पुढे म्हटले की, “अशीच परिस्थिती पेढ्याच्या भैरोबा रस्त्याच्या कामातही पाहायला मिळाली. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर केवळ कारवाईची भाषा न करता त्यांना तात्काळ काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकले पाहिजे. सार्वजनिक निधीची उधळपट्टी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही चौकशी झाली पाहिजे.”
या आरोपांबाबत संबंधित ठेकेदार, पालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.






