
सातारा, दि. ६ : भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यातील घाटमाथा व दुर्गम भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून संबंधित तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढली असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच काही ग्रामीण व दुर्गम मार्गांवर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करणे धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाने नमूद केले आहे.
तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त अहवालांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शासनाच्या संबंधित परिपत्रकान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.
संबंधित शाळा व महाविद्यालय प्रशासनाने या आदेशाची तात्काळ व काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.
०००००





