सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या महत्त्वाच्या शक्तिप्रदर्शनावेळी महायुतीतील काही प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.विशेष म्हणजे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील हे अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत झालेल्या गोंधळानंतर महायुतीतील काही नेते नाराज असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीतील घडामोडींमुळे काही नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत असून, त्याचे पडसाद आता विधानपरिषद निवडणुकीत उमटत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तथापि, संबंधित नेत्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही केवळ राजकीय चर्चा आहे की महायुतीतील अंतर्गत नाराजीचे संकेत, याकडे सातारा व सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






