Thursday, May 28, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City खेड अपहार प्रकरणी सरपंच लता फरांदे अपात्र

खेड अपहार प्रकरणी सरपंच लता फरांदे अपात्र

16
Adv

सातारा दि. सातारा शहरालगत असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठ्या खेड ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतील सुमारे १६ लाख ७७ हजार १४३ रूपये आर्थिक अपहार व कारभारातील अनियमिता प्रकरणी खेडच्या लोकनियुक्त सरपंच लता अशोक फरांदे यांना दोषी ठरवित पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तर शासन परिपत्रकानुसार आवश्यक ती पडताळणी करून लता फरांदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे. दरम्यान सरपंच लता फरांदे यांच्यावरील कारवाईने खेड सह जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध विकासकामांतील ग्रामनिधीमध्ये सुमारे १६ लाख ७७ हजार १४३ रूपये आर्थिक अपहार झाला असल्याची तक्रार पुणे येथील अभिजित खेडकर, उल्हास अग्निहोत्री, अभिषेक हरिदास व खेड येथील साहिल शेख यांनी केली होती. त्यानुसार सातारा पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेस पाठविला. त्यानंतर जावलीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने ग्राम निधीमध्ये सुमारे १६ लाख २७ हजार १४३ रूपये आर्थिक अपहार व सुमारे ५० हजार रुपये आर्थिक अनियमितता झाली असून सरपंच व ग्रामविकास अधिकारी दोघेही जबाबदार असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. त्यानंतर तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समितीचा अहवाल, कागदपत्रे, महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील तरतूदी याचे एकत्रित अवलोकन करून ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांमध्ये १६ लाख २७ हजार १४३ रूपये आर्थिक अपहार व ५० हजार रुपये आर्थिक अनियमितता झाली असल्याचा अहवाल पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठविला.
यावर पुणे विभागीय आयुक्तांनी ग्रामपंचायतीचे आर्थिक कामकाज सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने होते. त्यासाठी वित्तीय नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. जावली गटविकास अधिकाऱ्यांच्या समितीने गैरव्यवहाराबद्दल स्पष्ट अभिप्राय नोंदवला नसला तरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सुनावणी मध्ये प्रथमदर्शनी आर्थिक अपहार झाल्याचा अभिप्राय नोंदवला आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारावर सरपंच यांचे नियंत्रण नसून त्यांनी आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता न बाळगता कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध करून या प्रकरणी लता फरांदे यांना उर्वरित कालावधीसाठी सरपंच व सदस्य या पदावरून आले असल्याचा विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला आहे.
दरम्यान खेडच्या सरपंच अपात्रता प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून निकाल देण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला होता. यावर ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी मुदतीत सुनावणी होऊन निकाल देण्याच्या सुचना करण्यात येतील. सरपंच दोषी आढळल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणारच असे स्पष्ट केले होते.
[ आ. महेश शिंदे काय भूमिका घेणार ? – निखिल यादव
खेड ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे यांची सत्ता आहे. लोकनियुक्त सरपंच लता फरांदे यांची पहिल्या पासुनच वादग्रस्त कारकीर्द ठरली आहे. ग्रामपंचायतीमधील गैरकारभाराबद्दल आम्ही वेळोवेळी ठोस भूमिका जनतेसमोर मांडली आहे. एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे यांचा कंट्रोल नव्हता की, पदाधिकारी, सदस्य त्यांचे ऐकत नव्हते ? तसेच सरपंच लता फरांदे यांनी अपहार केल्याचे सिद्ध झाले तर मी पदाचा राजीनामा देईन असे त्यांनी जनतेला सांगितले होते. आ‌. महेश शिंदे शिस्तप्रिय लोकप्रतिनिधी आहेत.आता सरपंच लता फरांदे यांनी अपहार केल्याचे सिद्ध झाले असून आ. महेश शिंदे काय भूमिका घेणार ? असा सवाल ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल यादव यांनी केला आहे. ]

Adv