साताऱ्यातील प्रभाग क्र. 16 मधील मुस्लिम लोकवस्तीच्या भागात पवित्र रमजान महिन्यात पाणीपुरवठा कमी वेळ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ऐन उपवासाच्या काळात काही ठिकाणी फक्त अर्धा तास पाणी सोडले जात असल्याने मुस्लिम बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणी नागरिकांनी शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख संभाजी पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर नगरसेवक विनोद मोरे यांच्यासह त्यांनी प्राधिकरण कार्यालय गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला. विशिष्ट भागात जाणूनबुजून पाणी कमी वेळ दिले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
पाणी सोडण्याचे काम ठेकेदारामार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांकडून होत असल्याने त्यांच्यावर प्राधिकरणाचे नियंत्रण नसल्याची टीकाही करण्यात आली. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित कामगारावर तात्काळ कारवाई करावी, तसेच प्रभागातील सर्व भागात वेळेत व मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली.
कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संभाजी पाटील यांनी यावेळी दिला






