
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल आव्हानाची भाषा करणाऱ्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी खरपूस समाचार घेतला आहे. जयकुमार गोरे हे नेते नव्हेत तर नेणते आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
फलटण नगरपालिका निवडणुकीनंतर शुक्रवारी नूतन नगराध्यक्षांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमावेळी जयकुमार गोरे यांनी आव्हानाची भाषा वापरली होती. त्याबद्दल शिवसैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चंद्रकांत जाधव यांनी या भाषेवरून गोरे यांना खडे बोल सुनावले आहेत.
आपण एक जबाबदार मंत्री असल्याचे विसरून गोरे नेणते असल्यासारखे बोलत आहेत.आमच्याकडे दाढी आहे आमच्या नादाला लागू नका असे त्यावेळी मस्तवालपणे सांगणाऱ्या गोरे यांना, तुमची दाढी खुरटी व भुरटी आहे अशा शब्दात जाधव यांनी फटकारले.
सत्तेचा माज फार काळ टिकत नाही. राजकारण म्हटले की जय पराजय आलेच. पण कोरेगाववाल्यांनी विरोध केला, तो कुठे आहे ? उत्तरवाल्यांनी विरोध केला, तो कुठे आहे ? फलटणवाल्यांची काय अवस्था झाली ? ही वाक्ये गोरे अशा अविर्भावात बोलत होते, की या सर्वांना त्यांनीच पराजित केले आहे. वास्तविक पाहता निवडणुकीतील जय – पराजय तत्कालीन परिस्थितीनुसार ठरत असतो. तेरा वर्षे पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झाला होता. हे महाशय त्यावेळी राजकारणात असते, तर तो पराभव मीच केला असे म्हणायला त्यांनी मागेपुढे पाहिले नसते असा सणसणीत टोला त्यांनी गोरे यांना लगावला. कारण निवडणूक झाल्यानंतर
बोलताना प्रत्येकाने आपण कोणावर आणि काय बोलत आहोत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरील पोस्टच्या अनुषंगाने एका मुलाला दिल्या गेलेल्या धमकीच्या अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई निवडणूक काळातील फलटणच्या सभेत बोलले होते. कार्यकर्त्यांना राजकीय व मानसिक ताकद देण्याच्या दृष्टीने ते वक्तव्य होते. परंतु निवडणूक झाली तरी अशाप्रकारे खुनशी प्रवृत्ती ठेवणे याला नेता नव्हे, तर नेणता म्हणतात. गोरे हे नेते नसून नेणते आहेत. एकदा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवाराने सर्वांचे नेतृत्व करायचे असते. हा आपला कार्यकर्ता, आपला विरोधक न समजता सर्वांना समान न्याय द्यायचा असतो. परंतु विरोधकांना दुश्मन समजण्याची तुमची पद्धत ही तुम्हाला अस्ताकडे नेणार आहे. त्याची सुरुवात तुम्ही करून घेतली आहे. शिवसैनिकांच्या अस्मितेला डिवचल्यामुळे हे दिवस आणखी जवळ येतील असे ते म्हणाले.
चौकट
पृथ्वीराज बाबांच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत तुम्ही दाखवू शकत नाही !
आपण कायम सत्तेच्या बरोबर राहिलात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत राहिलात. भाजपच्या सत्तेची चाहुल लागतात आपण भाजपमध्ये उडी घेतली. ज्या पृथ्वीराज बाबांनी तुम्हाला सुरुवातीच्या काळात ताकद देऊन मोठे केले, ते परवा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी उपस्थित असताना तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहूही शकला नाहीत, ती हिम्मत तुम्ही दाखवू शकला नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्राने व्हायरल व्हिडिओतून पाहिले. ती रील तुफान व्हायरल झाली आहे. हा नैतिक अध:पतनाचा प्रकार जनतेने टिपला आहे याचा आपण विचार करावा असे खडेबोल चंद्रकांत जाधव यांनी गोरे यांना सुनावले आहेत.




